समितीत सहभागी होण्याचे आवाहन
अमरावती :
आपल्या कवितेने व गजलेने संपूर्ण महाराष्ट्राला व महाराष्ट्रातील रसिकांना वेड लावणारे कवीश्रेष्ठ श्री सुरेश भट यांचे स्मारक अमरावतीला व्हावे यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्यासाठी एक समिती कविश्रेष्ठ सुरेश भट स्मारक समिती या नावाने गठीत करण्यात येणार आहे. कवीश्रेष्ठ सुरेश भट यांचे स्मारक अमरावतीला व्हावे यासाठी गेल्या पाच वर्षापासून अविरत प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही या प्रयत्नाला यश आले नाही. हा प्रश्न शासन दरबारी लावून घेण्यासाठी एका सर्वव्यापी नागरिक समितीचे गठन करण्याचे ठरविण्यात आले आहे. यापूर्वी पालकमंत्री. मंत्री .खासदार आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत. तसेच प्रसिद्धी माध्यमाने देखील ही गोष्ट उचलून धरली आहे. नागपूरच्या धर्तीवर अमरावतीला देखील कवीश्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या स्मारक व्हावे असे येथील साहित्यिक मंडळींना मनोमन वाटते. योगायोगाने केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ठ नाते संबंध अमरावतीला आहेत. शिवाय कवी श्रेष्ठ सुरेश भट यांचा नावलौकिक त्यांचे स्मारक होण्याइतकाच मोठा आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी व शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी एका सर्वव्यापी नागरिक समितीचे गठन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यांना या समितीमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नावे या समितीचे मुख्य संयोजक व कविश्रेष्ठ श्री सुरेश भटांचे मित्र प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांना 9890967003 या क्रमांकावर पाठवावीत असे आवाहन या प्रसिद्ध पत्रकातून करण्यात आले आहे. येत्या 15 एप्रिल रोजी कवी श्रेष्ठ सुरेश भट यांची जयंती असून त्यानिमित्त देखील आयोजन करण्यात ही समिती निर्णय घेणार आहे. समितीचे अस्थायी कार्यालय तूर्त प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे जिजाऊ नगर महापौरांच्या बंगल्यासमोर विद्यापीठ रोड अमरावती कॅम्प येथे राहणार असून यास्मारकाला गती येण्याच्या दृष्टिकोनातून लवकरच शहराच्या मध्यभागी नवीन कार्यालय प्रारंभ करण्यात येणार आहे. कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी रसिकांनी या स्मारक समितीमध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.