सिंधुदुर्गातील काँग्रेस जिल्हा कार्यकारीणीत कोणतेेही बदल नाहीत…
नव्या प्रदेशाध्यक्षांचा दिलासा; आयाराम-गयारामांना थारा नाही, जुन्यांना घेवूनच मोट बांधणार…
सावंतवाडी
आम्हाला संघटना मजबूत करायची आहे. त्यामुळे विद्यमान जिल्हाध्यक्षांसह अन्य कार्यकारीणी तशीच कायम ठेवण्यात येणार आहे. आवश्यक वाटल्यास काही ठिकाणी बदल करण्यात येणार आहे, अशी भूमिका कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज येथे मांडली व विद्यमान कार्यकारिणीला त्यांनी अप्रत्यक्ष मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले. दरम्यान येणार्या काळात पुन्हा एकदा पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी संघटना मजबूत करण्यात येणार आहे. परंतू आयाराम-गयारामांना आता थारा देणार नाही तर प्रामाणिकपणे काम करणार्यांना संधी देणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग दौर्यावर असलेल्या श्री. सपकाळ यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नव्याने प्रदेशाध्यक्षपदाची निवड झाल्यामुळे जिल्हा कार्यकारीणी बदलणार का? असा सवाल त्यांना विचारला असता त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, या ठिकाणी आम्हाला संघटना वाढवायची आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करणार्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे कार्यकारीणी तशीच राहणार आहे. मात्र काही ठिकाणी आवश्यक वाटल्यास निश्चितच बदल करू.
ते पुढे म्हणाले, मधल्या काळात काही जण पक्षात आले होते. परंतू त्यांनी आपला स्वार्थ संपल्यानंतर आपल्या सोबत पक्षातील लोकांना नेले. त्यामुळे आता ही चूक होणार नाही. आयाराम-गयाराम लोकांना या ठिकाणी थारा देणार नाही.
यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा काँग्रेस प्रभारी अजिंक्य देसाई, प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस रामचंद्र उर्फ आबा दळवी, विलास गावडे, दिलीप नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, प्रकाश जैतापकर, अमिदि मेस्त्री, महेश अंधारी, राजू मसुरकर,किरण टेम्बुलकर, नागेश मोर्ये, राघवेंद्र नार्वेकर, रवींद्र म्हापसेकर, साक्षी वंजारी,अरूण भिसे आदी उपस्थित होते.

