रेल्वे गाड्यांमध्ये कोकणी खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्या -: माजी आमदार परशुराम उपरकर
कोकण रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली मागणी…
कणकवली
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांना कोकणी खाद्य व फळे उपलब्ध करून देण्याची सूचना कॅटरर्स व ठेकेदारांना करावी, अशी मागणी कोकण रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याकडे शिवसेना ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. विशेषतः कोकण रेल्वेतून प्रवास करताना मासे व कोकणातील फळे व खाद्य पदार्थ खाण्याला प्रवाशांची पसंती असते. कोकण व गोव्यात हे पर्यटक जात असतात. रेल्व गाड्यांमध्ये कोकणी खाद्यपदार्थ, मच्छी जेवण, भात, सोलकढी पदार्थ मिळण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे फळांच्या सिझनमध्ये आंबा, काजू, जांभूळ, करवंदे, फणसाचे गरे अन्य फळे आकर्षक टोकरीतून (डब्यातून) देणे गरजेचे आहे. यासाठी अधिक आकार घेतला तरी चालू शकेल. कोकणातून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये कोकणातील खाद्यपदार्थ देण्याची सूचना कोकण रेल्वे प्रशासनाने नेमलेल्या कॅटरर्स व ठेकेदार यांना द्यावी. कारण साऊथमध्ये गेल्यानंतर कढराईस, इडलीवडा, वडा, डोसा केळ्याची भजी, सांबारभात अशा प्रकारचे खाद्यपदार्थ दिले जातात. उत्तर दिशेने जाताना डाळ भात, डाळ चपाती, पनीर भाजी अशा विविध प्रकारच्या भाज्या दिल्या जातात. त्या व्यतिरिक्त कोणतेही पदार्थ दिले जात नाहीत. त्यामुळे कोकणातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांना आलू सब्जी व कोकणी फळे व मासे जेवण सिझनमध्ये मिळण्याची गरज आहे. या गाड्यांमधील प्रवाशांना नाश्ता आणि माशांचे जेवण, फळांची प्लेट, कोकणी पद्धतीने जेवण देण्याची सूचना करुन पर्यटकांना कोकणातील खाद्यापदार्थांची आवड निर्माण व्हावी व कोकण रेल्वेतून कोकणी पदार्थ मिळतात, अशा प्रकारची कोकण रेल्वेची ख्याती व्हावी. तसेच कोकण रेल्वे गाड्यांमध्ये खाद्यपुरवठा करणाऱ्या ठेकेदारला कोकणी खाद्यपदार्थ व फळे पुरविता येत नसतील तर सुशिक्षित बेरोजगारांना हे पदार्थ विकण्याची सर्व गाड्यांमध्ये परवानगी देण्यात यावी, अशी मागणी उपरकर यांनी केली आहे.

