You are currently viewing मेरी मर्जी..

मेरी मर्जी..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*मेरी मर्जी..*

 

मुंबईस्थित *इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स*या कॉलेजमध्ये मी बीएस्सीच्या(B.SC) शेवटच्या वर्षाला होते. त्यावेळची एक मनावर ठसलेली घटना..

 

आमच्या कॉलेजच्या इमारतीचे १रुंदीकरण चालू होते. बांधकामास लागणाऱ्या सामानाचा बराच पसारा कॉलेजभोवती अस्ताव्यस्त विखुरलेला होता. सामानाची ने आण करणारे ट्रक्स, मजूर यांची तिथे भरपूर वर्दळ होती. ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा शेवटचा तास संपवून मी कॉलेजच्या मुख्य १इमारतीतून बाहेर पडून रस्त्यावर येत असताना माझ्या कानावर एक दमदार, ठाम

सूरात उच्चारलेलं एका मजुराचं वाक्य सहज कानी पडलं आणि मी क्षणभर थबकले. ट्रकमधून आलेली रेती उपसत असताना तो त्याच्या सह- कामगाराला काहीसं उपहासाने आणि तावातावानेही त्याच्या बिहारी लहेजात सांगत होता, “देख भाई! हम सेठ का तो सेठ नही है लेकिन हमारे दिल का तो मालिक है ना?”

 

कष्टकरी वर्गातला, हातावर पोट सांभाळणारा, एका निरक्षर, अशिक्षित मजुराने उच्चारलेल्या त्या वाक्यात मला खरोखरच त्या क्षणी एक महान तत्त्वज्ञानच जाणवलं.

 

मूलभूत तत्त्वाने प्रत्येक माणूस हा स्वातंत्र्यप्रेमी असतोच. प्राप्त परिस्थितीमुळे तो भले कोणाचातरी गुलाम बनत असेल पण या गुलामगिरीचे जोखड झुगारून देण्याची दुर्दम्य इच्छा त्याच्या हृदयात सतत दडलेली असते हे निश्चित.

 

तो मजूर कोण होता, कुठून आला होता, कुणासाठी काम करत होता, त्याला किती रोजगार मिळत होता, त्याचं काम काय होतं याविषयी मला कसलीच कल्पना नसली तरी त्याच्या त्या एका वाक्यानं मला जाणवलं होतं की त्याच्यावर नक्कीच काहीतरी अन्याय झालेला आहे. कदाचित ठराविक कामापेक्षा अधिक काम त्याच्यावर लादलं गेलं असेल किंवा मरमरून काम करूनही योग्य तो मोबदला त्याला मिळाला नसेल अथवा ठेकेदार विनाकारण त्याला माणूसकीशून्य वृत्तीने वागवत असेल. पोटासाठी काम करणारा माणूस लाचार असतो. मिळालेल्या कामावर लाथ मारून पाठ फिरवणे त्याला परवडण्यासारखं नसतं पण म्हणून काय झालं? कुठेतरी एक मन जिवंत असतं. त्यात विद्रोहाची ठिणगी कधीतरी पेट घेतेच आणि तेव्हाच ती व्यक्ती स्वतःचं अस्तित्व चाचपडायला लागते.

“ मी का म्हणून हे करू?”

“ मी नाहीच करणार हे सहन.”

“ काय वाट्टेल ते होऊ दे, आज मी माझा हक्क बजावणारच.”

“ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच..”

अगदी याच तीव्र भावनांची स्फुल्लिंगं मला त्या मजुराच्या, त्या वाक्यातून फुटत आहेत असंच वाटलं.

“हमारे दिल का तो मालिक है ना हम?”

 

नंतर कितीतरी दिवस माझ्या मनावर हे वाक्य रेंगाळत होतं नव्हे ते कायमच माझ्या सोबत राहिलं. त्या वाक्यानं मला सदैव एक ऊर्जा दिली आहे. विशेषतः स्त्री म्हणून जगत असताना नकळतपणे माझ्या आयुष्याची टॅगलाईनच त्या वाक्याने ठरवली जणू!

कुटुंब असो, नोकरीचे ठिकाण असो, सार्वजनिक, सामाजिक, राजकीय क्षेत्र असो, मित्र-मैत्रिणींचा परिवार असो… जिथे जिथे स्वत्व गमावण्याचे क्षण आले, स्वाभिमानाला भेगा पडत आहेत असे वाटले तेव्हा तेव्हा,” हमारे दिल का तो मालिक है ना..” या शब्दांनी सतत जागवले. नैराश्यापासून दूर केले. जगताना नकारात्मकता कधीच येऊ दिली नाही.

 

आयुष्यभर मी गाढा अभ्यास केला, मोठमोठे ग्रंथ वाचले, तत्त्वज्ञानाचे चिंतन, मंथन केले, प्रकांड पंडितांची भाषणे ऐकली पण खरं सांगते.. तुम्हाला अवास्तव वाटेल कदाचित पण खरी साथ जर मला कोणी दिली असेल तर माझ्या अंतस्थ गाभाऱ्यात कायम घुमणाऱ्या याच शब्दांनी. “हम हमरे दिलका तो मालक है ना..मर्जी मेरी..

 

*राधिका भांडारकर*.

प्रतिक्रिया व्यक्त करा