You are currently viewing १५ मार्चला काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सिंधुदुर्ग दौऱ्यावर

१५ मार्चला काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सिंधुदुर्ग दौऱ्यावर

पक्ष मजबुतीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा; प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांची माहिती

कुडाळ :

काँग्रेसचे नूतन प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे येत्या १५ मार्चला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत आणि त्याची सुरुवात ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून करतील अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी दिली. कुडाळ येथे एमआयडीसी रेस्ट हाऊस वर ॲड. पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी ॲड. गणेश पाटील यांच्यासह प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, टिळक भवनचे अध्यक्ष नामदेव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष साईनाथ चव्हाण जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रकाश जैतापकर, ॲड दिलीप नार्वेकर, विलास गावडे, व्ही. के. सावंत. विजय प्रभू, प्रवीण वरुणकर, अरविंद मोंडकर, जेम्स फर्नांडिस, महेंद्र मांजरेकर, महेंद्र सांगेलकर, अभय शिरसाठ किरण टेंबुलकर, रवींद्र म्हापसेकर, श्रीकृष्ण तळवडेकर, सुरज घाडी, अनिकेत दहिबावकर, विधाता सावंत आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲड.गणेश पाटील म्हणाले, ज्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेस अडचणीत आहे अशा जिल्ह्यांमध्ये जाऊन पक्ष मजबुतीसाठी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करावी या उद्देशाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे. याबाबतचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख आणि काँग्रेसचे पदाधिकारी जाहीर करतील. प्रामुख्याने कार्यकर्त्यांशी चर्चा हाच दौऱ्याचा मुख्य हेतू असून त्यानंतर ते १६ मार्च रोजी रत्नागिरी दौऱ्यावर जातील असे ॲड. पाटील यांनी सांगितले.

मागे काय झाले याबाबत मी काही बोलणार नाही पण पुढच्या काळामध्ये फरक दिसेल. कुडाळच्या माजी नगराध्यक्ष आफरीन करोल आणि अक्षता खटावकर या अलीकडेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्या त्याबद्दल बोलताना ॲड. पाटील म्हणाले, काही पक्षांतरे ही वैयक्तिक कारणांमुळे किंवा अडचणींमुळे होऊ शकतात. त्याशिवाय राज्यामध्ये हल्ली काहीसे दडपशाहीचे वातावरण आहे आणि काही वेळा स्वार्थ असतो. या कारणांमुळे त्या गेल्या असतील पण ते गेले ते गेले त्या बाबतीत काय बोलायचे असे ॲड. पाटील म्हणाले.

 

विरोधी ग्रामपंचायतींना निधी देणार नाही हे पालकमंत्री नितेश राणे यांचे वक्तव्य निषेधार्ह असल्याचे ॲड गणेश पाटील यांनी म्हटले. मंत्रिपदावर काम करताना शपथ घ्यावी लागते. त्यामुळे काम करताना पक्षाची झूल बाजूला ठेवून जनतेचे काम करावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते. सरकारने जनतेसाठी काम करणे अपेक्षित आहे. पण पालकमंत्री म्हणून नितेश राणे तसे वागत नसतील तर निश्चितच निषेधार्ह आणि चुकीचे असल्याचे ॲड. पाटील यांनी सांगितले.

उभाठा गटातून सुद्धा अनेक नेते भाजप शिवसेनेत जात आहेत त्याबाबत बोलताना तो त्या पक्षाचा प्रश्न असल्याचे ॲड. पाटील यांनी सांगितले. पक्ष म्हटल्यावर राजी नाराजी सगळीकडे असते अगदी घरात सुद्धा असते. पण काँग्रेसमध्ये त्या प्रमाणात नाराजी नाहीये जर असलीच तर ती आम्ही सांभाळून घेतो त्यामुळे आमच्या पक्षातून आउटगोइंग राहणार नाही अशी ॲड. गणेश पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा