पडेल येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न
देवगड:
पडेल ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच भूषण पोकळे, माजी सरपंच विकास दीक्षित, पडेल मंडळाचे भाजपा अध्यक्ष बंड्या नारकर, उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, अंकुश ठुकरुल, वैभव वारीक, संजय मुळम, पडेल मुख्याध्यापक हिराचंद तानावडे, डॉ. आरोही दीक्षित, डॉ. पूजा मालपेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा, खो-खो स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून स्पर्धेमध्ये भाग घेतला. या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. पडेल ग्रामपंचायतीने यापूर्वी देखील अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.
समाज हा परिवर्तनशील असतो आपण महिलांविषयी आपले विचार आणि दृष्टिकोन बदलला तर स्त्री पुरुष असा भेदभाव राहणार नाही. महिलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्तुत्ववान भरारी ही गावाबरोबरच देशाला यश मिळवून देणारी आहे. महिलांचा सन्मान हा महिला दिना दिवशी न राहता कायम त्यांचा आदर राखला पाहिजे, असे मत पडेल गावचे सरपंच भूषण पोकळे यांनी व्यक्त केले.
सरपंच भूषण पोकळे पुढे म्हणाले की, गावच्या विकासासाठी महिलांचे योगदान हे मोठे असते. शासनाकडून आलेल्या अनेक योजनांची अंमलबजावणी गावचे नागरिक म्हणून महिला प्रथम करीत असतात. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी एक साधन निर्माण झाले आहे. या बचत गटांना प्रोत्साहित करण्यासाठी पडेल ग्रामपंचायत ही नेहमी सहकार्य करीत असते.
गावचा विकास करीत असताना महिलांना केंद्रबिंदू ठरवून विकास आराखडा आम्ही नेहमीच तयार करतो. कारण गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महिलांचे योगदान हे मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.

