“मुहूर्त का टळला”…. ???
सावंतवाडी अर्बन बॅंकेचे तत्कालीन चेअरमन स्व. वामनराव कामत, व्हाईस चेअरमन स्व. मधुसूदन पोकळे अशा फार जुन्या जाणत्या सेवाभावी लोकांनी सावंतवाडी अर्बन बँकेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली होती. दक्षिण कोकणातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची बॅंक म्हणून ही बॅंक ओळखली जायची. या बँकेतून पस्तीस वर्षापूर्वी स्व. वामनराव कामत चेअरमन असताना मी व माझ्या पोस्टातील काही सहकाऱ्यांनी वाहन कर्ज घेतले होते. .. आणि वेळेत परतावा केला होता.
गेल्या पंचवीस वर्षापासून आर्थिक सक्षम असलेल्या बँकेला घरघर लागली. याची खरी कारणे सर्वश्रुत आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून सावंतवाडी अर्बनवर मा. विद्यमान आमदार दिपकभाई केसरकर यांच्या “आवडीची” माणसेच कारभार पहात होती. गेल्या वीस वर्षापासून या बॅकेच्या आर्थिक व्यवहाराबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा मिडियाच्या माध्यमातून तसेच सहकार खात्याकडे तक्रार करून संघर्ष करत होतो. तब्बल तीन वेळा एकट्याने निवडूक लढवली आणि त्यावेळी चुकीच्या गोष्टी भागदारांका समोर आणल्या… पण माझ्या मर्यादा होत्या. सत्तेपुढे शहाणपणा नसतो. दक्षिण कोकणातील सगळ्यात मोठी ग्राहक संस्था ज्याचे संस्थापक संचालक महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री स्व. भाईसाहेब सावंत होते. ती कनझ्युमर्स सोसायटी सुध्दा व्हेंटिलेटरवर आहे. सावंतवाडी इतर काही शैक्षणिक संस्थेवर “आवडती” माणसे कार्यरत होती त्यांची पण तीच स्थिती.
वर्षभरापूर्वी आरबीआयने सावंतवाडी अर्बनचा कारभार पाहून ही बॅक ठरलेल्या मुदतीत इतर आर्थिक द्रुष्टीने सक्षम असलेल्या बॅकेत विलीनीकरण करण्याबाबत सुचवले नाहीतर प्रशासक नेमणे अनिवार्य. त्यामुळे सहा महिन्यापूर्वी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. ठराविक मजकुराचे चिटकोरे तयार करून लोकशाही मार्गाने मतदान प्रक्रिया पार पडली. उपस्थित भागदारांकानी सह्या करून आपले पवित्र मत पेटीत टाकले. याला अपवाद फक्त तिघेजण होते. त्यात मी एक होतो.नंतर सर्वसाधारण सभेत भागदारकांच्या शेअर्स बाबत कोण जबाबदारी घेणार? असा प्रश्न माझ्यासह आणखीन चार सजग भागदारांकानी उपस्थित केला.. मात्र नेहमीप्रमाणे आमचा आवाज दाबून गदारोळात विलीनीकरणाचा निर्णय संमत झाला.
त्यानुसार ठाणे जनता सहकारी बॅकेबरोबर सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले असावेत असा आपला माझा अंदाज. ज्याअर्थी ठाणे सहकारी बँकेने नुतनीकरण वगैरे विषय युद्धपातळीवर सुरु केले. ठाणे जनता सहकारी बॅक ही अतिशय काटेकोर आर्थिक शिस्त पाळणारी व अल्पावधीतच लाखो ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बॅक. त्या बॅकेत संचालक निवडतात त्यांची पार्श्वभूमी व शैक्षणिक पात्रता तपासली जाते. कुणालातरी अर्धवट व अर्धशिक्षित माणसाला चेअरमनपद दिले जात नाही. अशी जनमानसात प्रतिमा असलेल्या ठाणे जनता सहकारी बॅकेत अर्बन बॅंक विलीन होत असेल तर त्याबाबत भागदारक म्हणून मी पण आनंदात होतो.
दहा मार्च ही तारीख ठरली. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी या देशातील सर्वच क्षेत्राचा प्रचंड अभ्यास असलेले, केंद्रीय मंत्री म्हणून अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळलेले,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्थावर कार्यरत असणारे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वर्षभरापूर्वी ज्यानी या देशाच्या राष्ट्रीय सहकार धोरणाबाबत अहवाल भारत सरकारला सादर केला ते मा. सुरेश प्रभू येणार होते… पण हा आनंददायी सोहळा दहा मार्चला होत नाही असे काही विश्वासू सुञांकडून समजते. अर्थात हा मुहूर्त का टळला? देव जाणे.
ठेवीदारांच्या ठेवी, भागदारकांचे शेअर्स आणि इतकी वर्षे काम करणारे कर्मचारी यांची सुरक्षितता लक्षात घेता ठाणे जनता सहकारी बँक हा योग्य पर्याय आहे. कायदेशीर अडचणी असू शकत नाहीत कारण आरबीआयच्या निर्धारित नियमानुसार ठाणे जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने त्या पूर्ण केल्याशिवाय असा उदघाटन सोहळा जाहीर करणार नाहीत.
गेल्या वीस वर्षांत निदान मी पंधराहून जास्त सर्वसाधारण सभा अटेंड केल्या. माझ्या क्षमतेनुसार मी अनेक बाबी मांडत असे पण थकीत कर्जदारांचा एक गट प्रत्येकवेळी माझा आवाज दाबत असे… ज्यांच्या आवडत्या माणसांनी ही वेळ आणली त्यांनी कधीच ठेवीदारांचा, भागदारकांचा वा कर्मचाऱ्यांचा विचार केला नाही. असो.. मुहूर्त टळला हे वाईटच झाले..
… अॅड. नकुल पार्सेकर..
…… शेअर्स कोमात गेलेला भागधारक..
