You are currently viewing पालकमंत्री ना.नितेश राणे व आमदार दिपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पालकमंत्री ना.नितेश राणे व आमदार दिपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पालकमंत्री ना.नितेश राणे व आमदार दिपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

दोडामार्ग

राज्य सरकार हत्ती पकड मोहिमे संदर्भात प्रस्तावाची फाईल ज्या स्तरावर आहे त्याठिकाणी आपला पाठपुरावा आहे. सोमवारी काही प्रतिनिधींसोबत मुंबईला मंत्रालयात वन मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करुन तोडगा काढू. तसेच आपण शेतकऱ्यांसोबत आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी निश्चिंत रहा असे मत्स्य व बंदर विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वराज्य सरपंच सेवा संघांचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांच्याशी संपर्क साधलाआहे. त्यानंतर रात्री उशिरा जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते उपोषण मागे घेण्यात आले

उपोषणकर्ते प्रवीण गवस, हेवाळे उपसरपंच समीर देसाई यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आमदार दीपक केसरकर यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेत चर्चा केली.

तिलारी खोऱ्यात हत्ती पकड मोहीम राबवा. तसेच ही मोहीम राबविल्यानंतर हत्ती पुन्हा येणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा या मागणीसाठी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व शेतकऱ्यांनी दोडामार्ग वनविभाग कार्यालयासमोर उपोषण छेडले असून आहे. मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषण माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतल्याने हे उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस,भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर,नगरसेवक संतोष नानचे, हेवाळे सरपंच – साक्षी देसाई, साटेली भेडशी सरपंच – छाया धरणे, तेरवण मेढे सरपंच सोनाली गवस, मोर्ले उपसरपंच संतोष मोर्ये, मोर्ले माजी सरपंच सुजाता मणेरीकर, शिवसेना तालुका संघटक गोपाळ गवस, कोलझर सरपंच सुजल गवस, उबाठा महिला तालुकाप्रमुख श्रेयाली गवस, शिवसेना महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, नगरसेवक चंदन गावकर, विजय जाधव, यांसह शेकडो शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. तर सायंकाळी उशिरा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सरचिटणीस महेश सारंग, मंदार कल्याणकर आदींनी भेट घेत चर्चा केली.

प्रवीण गवस यांना प्रकृती खालावल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याच दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांचा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क झाला. त्यावेळी पालकमंत्री यांनी प्रवीण गवस यांना सांगितले की, हत्ती पकड मोहिमे संदर्भात ठोस उपाययोजना करणार आहे. आपण हवेत काहीच बोलत नाही. हत्ती पकड मोहीम राबविण्यात यावी यासाठी आपला लक्ष असून त्याप्रमाणे पाठपुरावा करत आहे. लवकरच तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

उपोषणकर्ते प्रवीण गवस यांनी पालकमंत्री राणे यांच्याकडे अधिकारी वर्ग चालढकल करत असल्याचा आरोप केला.

येत्या सोमवारी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात मार्ग काढू. तुम्ही तुमच्या काही प्रतिनिधीसोबत मुंबईला मंत्रालयात या असेही प्रवीण गवस यांना भ्रमणध्वनीद्वारे यावेळी सांगितले.

वन विभागाने कागदी घोडे नाचवू नकोत. त्वरित कार्यवाही होणे गरजेचे आहे. आणि तुम्ही हे करू शकतात. अधिकाऱ्यांना काहीही आमचे देणे घेणे नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्या काही उपाययोजनासाठी निधी मागितला आहे. त्यासाठी १२० कोटी रुपये आतापर्यंत दिले गेले आहेत. त्यामुळे आमदार म्हणून आपण शासनाकडून मंजूर करून आणलेल्या निधीचा वनविगाने वाया घालवला आहे असा गंभीर आरोप देखील प्रवीण गवस यांनी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केला. त्यावेळी आमदार केसरकर यांनी तात्काळ या संदर्भात आपण वनमंत्र्यांसोबत बैठक घेऊन ठरवू असेही सांगितले.

काही तांत्रिक बाबी, परवानग्या आहेत त्या शासन स्तरावर निर्णय घेऊन होतात. यापूर्वी हत्ती पकड मोहीम राबविली होती. त्यावेळी एका हत्ती दगावला आहे. त्यामुळे या विषयाला हात घालायला कोणीही धजावत नाही आहे. मात्र आमचे नवीन वनमंत्री यावर निर्णय घेतील येत्या बैठकीत ते शंभर टक्के निर्णय घेणार आहेत असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा