आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येरळामाई जनसहयोग फाऊंडेशनतर्फे जनजागृती अभियान
हणमंतवडीये, ता. कडेगांव, सांगली :
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येरळामाई जनसहयोग फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, हणमंतवडीये येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांचे हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन करत सर्व उपस्थितांना माहितीपत्रके वितरित करण्यात आली.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महिलांच्या सन्मानासाठी घेतलेल्या या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरी पत्रके नेऊन कुटुंबीयांना वाचण्यास सांगितले. यामुळे गावातील तब्बल 138 कुटुंबांमध्ये महिलांच्या हक्कांविषयी जागृती होण्यास मदत होणार आहे.
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी ‘महिला सन्मान शपथ’ उपस्थितांना दिली. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महिलांचे स्थान आणि अधिकार याविषयी अशा प्रकारे जागृती होणे गरजेचे असल्याचे मत संस्थेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.
यशस्वी आयोजनाबद्दल येरळामाई जनसहयोग फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, हणमंतवडीये येथील मुख्याध्यापक, शिक्षक आणि सहकाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.