You are currently viewing जागतिक महिला दिन विशेष – मनस्पर्शी साहित्य, कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित महिलांचे कवी संमेलन उत्साहात संपन्न

जागतिक महिला दिन विशेष – मनस्पर्शी साहित्य, कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित महिलांचे कवी संमेलन उत्साहात संपन्न

 

८ मार्च २०२५, शनिवार रोजी मनस्पर्शी साहित्य, कला व क्रीडा प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विशेष ऑनलाइन काव्य मैफिल मोठ्या उत्साहात पार पडली. महिलांच्या काव्य प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित या संमेलनात विविध क्षेत्रांतील कवयित्रींनी आपल्या काव्य सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध ग़ज़लकार डॉ. स्नेहल कुलकर्णी होत्या, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी सक्षमपणे कु. मानसी पंडित (अध्यक्षा) यांनी पार पाडली. मुख्य आयोजन श्री. निखिल कोलते (खजिनदार) यांनी केले, तर तांत्रिक सहाय्य सौ. जयश्री शेळके-शिळीमकर (सहसंचालिका) यांनी केले.

या काव्यसंमेलनात आमंत्रित कवयित्रींमध्ये मंगला कुमावत, प्रांजली हरकुड, विनिता कदम, भाग्यश्री खुटाळे, मेधा घोंगे, डॉ. मानसी पाटील, प्रतिभा कुलकर्णी, मंजिरी पैठणकर, शरयू पाम्पट्टीवार, दिपाली घाडगे व रेणुका मार्डीकर यांनी आपल्या बहारदार काव्यसादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

८ मार्च हा जागतिक महिला दिन संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. महिलांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी सुरू असलेल्या लढ्यांची आठवण करून देणारा हा दिवस साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण आणि विविध क्षेत्रांमध्ये महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.

साहित्याच्या माध्यमातून महिलांच्या विचारांना, भावना आणि सृजनशीलतेला मुक्त व्यासपीठ मिळावे या उद्देशाने मनस्पर्शी साहित्य, कला व क्रीडा प्रतिष्ठान दरवर्षी असे विशेष उपक्रम राबवत असते. यंदाच्या कवी संमेलनात विविध सामाजिक, भावनिक आणि स्त्री जीवनाच्या वास्तवावर आधारित कविता सादर करण्यात आल्या. काही कवितांमधून आत्मशोध, संघर्ष, निसर्गसौंदर्य, प्रेम आणि स्वाभिमान यांचे मनोज्ञ दर्शन घडले.

कार्यक्रमाच्या शेवटी माननीय राजेश नागुलवार उर्फ राजमन (सचिव) यांनी आभार प्रदर्शन करून सर्व सहभागी कवयित्री, संयोजक व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले.

ही अनोखी काव्यमैफल म्हणजे केवळ साहित्याची मेजवानी नव्हे, तर महिलांच्या सशक्तीकरणाचा एक महत्त्वपूर्ण संदेश देणारा उपक्रम ठरला. या काव्यमैफलीस रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला व जागतिक महिला दिनानिमित्त या अनोख्या उपक्रमाने साहित्य क्षेत्रात नवीन उर्जा संचारली.

प्रतिक्रिया व्यक्त करा