You are currently viewing जिल्ह्यात २२ मार्चपर्यंत मनाई आदेश

जिल्ह्यात २२ मार्चपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व ३७(३) नुसार ८ मार्च २०२५ रोजी ००.०१ वाजल्यापासून ते २२ मार्च २०२५ रोजी २४.०० वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केल्याचे जिल्हा दंडाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यात २ मार्चपासून रमजान मास प्रारंभ, १३ रोजी होळी, १४ रोजी धूलिवंदन, १७ रोजी शिवजयंती (तिथीप्रमाणे), ३० मार्चला गुढीपाडवा, ३१ मार्च रोजी रमजान ईद असे सण साजरे करण्यात येणार आहेत. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यापूर्वी राज्यात उत्सवाच्या कालावधीत अनुचित घटना घडल्या असून त्याचे पडसाद राज्यात उमटून विविध राजकीय पक्ष व संघटना आक्रमक झाल्या आहेत.

आगामी काळात त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटून तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. राज्यात विविध समाजाचे लोक आरक्षणाच्या मुद्यावरून उपोषण, आंदोलने होत आहेत. तसेच सोशल मीडियावर समाजकंटकांकडून धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट व व्हिडिओ प्रसारित करून विविध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत.

त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध समाजाचा आरक्षण मुद्दा, आगामी साजरे होणारे सण, उत्सव त्या अनुषंगाने जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट तसेच जिल्ह्यात होणारे उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रस्ता रोको यासारख्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये व जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मनाई आदेश लागू करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा