You are currently viewing सिंधुदुर्गची वस्तुस्थिती मांडणाऱ्या निलेश राणेंचे अभिनंदन – परशूराम उपरकर

सिंधुदुर्गची वस्तुस्थिती मांडणाऱ्या निलेश राणेंचे अभिनंदन – परशूराम उपरकर

सिंधुदुर्गची वस्तुस्थिती मांडणाऱ्या निलेश राणेंचे अभिनंदन – परशूराम उपरकर

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासात्मक प्रश्न आणि सरकारची आर्थिक स्थिती काय आहे, याबाबत आमदार निलेश राणे यांनी वस्तुस्थिती सभागृहात मांडली आहे. श्री राणे यांनी जी वस्तुस्थिती मांडली तीच आम्ही गेले काही कालावधी मांडत आहोत. याचाच अर्थ आम्ही जे सातत्याने मांडत आहोत ते आमदार निलेश राणे यांनी मान्य केले याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. मात्र एक भाऊ केवळ घोषणा देतो आणि दुसरा भाऊ वस्तुस्थिती मांडतो अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

श्री.उपरकर म्‍हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासात्मक प्रश्न, रस्त्यांची कामे, जिल्ह्यातील नगरपंचायतींना मिळणारा निधी, सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत ठेकेदारांची प्रलंबित असलेली देयके अशा एकूण अनेक प्रश्नांबाबत निलेश राणे यांनी विधानसभेच्या सभागृहात वस्तुस्थिती मांडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामांना येणारा अपुरा निधी प्रलंबित असलेली विकास कामे याबाबत आम्ही विरोधी पक्ष म्हणून सातत्याने आवाज उठवितो. मात्र सत्ताधाऱ्यांकडून केवळ आश्वासने व घोषणांच्या पलीकडे काहीच होत नाही. म्हणूनच विधिमंडळात आमदार निलेश राणे यांनी सत्ताधारी आमदार असतानाही ही वस्तुस्थिती मांडली त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदनच करतो.

उपरकर म्‍हणाले, श्री राणे यांनी सभागृहात सरकारच्याच कार्यपद्धतीची चिरफाड करताना मुंबई गोवा हायवे बाबतही काही मुद्दे उपस्थित केले. आमचे म्हणणे आहे की त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना या महामार्गावर वस्तुस्थिती दाखवण्यासाठी आणून आपली परखर भूमिका मांडावी त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा त्यांना आमच्या पाठिंबाच राहील.

सिंधुदुर्गातील जनतेला गेली काही वर्षे केवळ घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पडत आहे. आता तर ज्या आमदारांनी वस्तुस्थिती मांडली त्याच आमदारांचे भाऊ सत्ताधारी मंत्री असून ते केवळ घोषणाच करताना दिसतात. अशा परिस्थितीत जिल्हा विकास आराखड्याचे जाहीर करण्यात आलेले ४०० कोटी रुपये पालकमंत्री आणू शकणार का हा प्रश्न आहे. अशा स्थितीत आमदार राणे आणि जिल्हा विकासाच्या दृष्टीने मांडलेली भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे त्यांनी याच भूमिकेवर कायम राहत जिल्ह्यासाठी विकास निधी आणावा असेही उपरकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा