श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त) मध्ये
मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती उत्साहात साजरी.
सावंतवाडी
श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) मध्ये मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन’ व ‘कुसुमाग्रज जयंती’ उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.एम ए ठाकूर होते. मराठी
विभागप्रमुख प्रा.माणिक बर्गे, प्रा. सौ सुप्रिया केसरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
कुसुमाग्रजांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रा. माणिक बर्गे यांनी प्रास्ताविक करून मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व सांगून कुसुमाग्रजांच्या साहित्याविषयी माहिती करून दिली.
अध्यक्ष स्थानावरुन बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा एम ए ठाकूर म्हणाले की
मराठी राजभाषा दिन दरवर्षी 27 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. मातृभाषेचा गौरव म्हणून कुसुमाग्रजांच्या स्मृतीना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. कुसुमग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात, नाटककार ,कथाकार, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे.
आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपल्याकडे समृद्ध मराठी साहित्याचे खरे वाचन करून ते स्वतःच्या वैयक्तिक जीवनात आत्मसात करून स्वतःचे व इतरांचे जीवन समृद्ध बनविण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील विद्यार्थिनी कु. सिद्धी बोंद्रे हिने केले तर आभार मराठी विभागाच्या प्रा सौ. सुप्रिया केसरकर यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी मराठी विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.