नागपूर :
“पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा”
असे म्हणत मुख्य प्रवेशद्वारा तून चक्क प्रेक्षकांमधून प्रवेश करत मंचाकडे येणारे ‘कुसुमाग्रज’ पाहून सारे सभागृह चकित झाले. मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रत्यक्ष कुसुमाग्रजांचा अविष्कार सर्वांनाच अचंबित करून गेला.
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान आणि सेवादल महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी राजभाषा गौरव दिनाचे सेवादल महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी “मोगरा फुलला” या कार्यक्रमाची सुरुवात करताना गोविंद सालपे यांनी साकारलेली ही कुसुमाग्रजांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
यावेळी मंचावर सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री संजय शेंडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर जेष्ठ कवी, साहित्यिक, आणि बॉलिवूड मधील सुप्रसिध्द तसेच मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष मराठी साहित्य मंडळ असं बहुआयामी व्यक्तीमत्व श्री.सिद्धार्थ कुलकर्णी, मुंबई हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच मंचावर कवी संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध गझलकार श्री.सूर्यकांत मुनघाटे यांचे सह महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निरुपमा ढोबळे, मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विजया मारोतकर, प्रा. डॉ. सुशील मेश्राम, डॉ. माधव शोभणे उपस्थित होते.
“मी आजवर अनेकदा मराठी दिनाचा कार्यक्रम अनुभवला परंतु असा अनुभव सर्वप्रथम आला. मराठी भाषेसह बोलीभाषेचाही सन्मान होत राहावा असे मला वाटते ” असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय शेंडे यांनी व्यक्त केले. तसेच उद्घाटक श्री.सिद्धार्थ कुलकर्णी यांनी “मोगरा फुलला” या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने मला खिळवून ठेवले. मराठीला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा. यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. अशा महान साहित्यिकांना आपण मंचावर सादर करण्याची संकल्पनाच वैभवशाली आहे” असे गौरव उद्गार काढले.
सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनानंतर मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या विनय पाटील, गोविंद सालपे, चरण दास वैरागडे, प्रणोती कळमकर, मोनाली पोफरे यांनी स्वागत गीत सादर केले. विजया मारोतकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. आजवर या संस्थेने मराठीच्या अभिजात होण्याच्या योगदानात मराठी संदर्भात अनेक कार्यक्रम राबविले आहेत. आजचा हा ६१ वा कार्यक्रम आहे असे सांगितले.
तसेच आजच्या आयोजनामाची नेमकी भूमिका डॉ. सुशील मेश्राम यांनी मांडली. त्यानंतर मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान आणि सेवादल महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या सहभागाने “मोगरा फुलला” हा अभिनय युक्त सादरीकरणाचा कार्यक्रम सादर झाला. यामध्ये गोविंद सालपे यांनी कुसुमाग्रज, चारुदत्त अघोर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सविता सुरोसे यांनी सावित्रीमाई फुले, डॉ. माधव शोभणे यांनी राम गणेश गडकरी, संजीवनी मराठे यांनी बहिणाबाई चौधरी ,प्रणोती कळमकर यांनी शांताबाई शेळके, डॉ.सुशील मेश्राम यांनी प्र. के. अत्रे ,डॉ. अरविंद बुटले यांनी कवी बी, डॉ.मोनाली पोफरे यांनी इंदिरा संत, विद्यार्थिनी श्रेया डांगे हिने बहिणाबाई चौधरी, प्रा. मदनकर यांनी अवयव दानावरील गीत सादर केले. मराठी साहित्याचा पट उलगडणार्या या अभिनयुक्त सादरीकरणाने मराठी भाषेचा पूर्व इतिहास जागृत झाला. ‘मोगरा फुलला’ या अभिनययुक्त सादरीकरणाच्या कार्यक्रमाचे निवेदन विजया मारोतकर यांनी केले.
श्री.राजू वाघ यांनी रस्त्यावर होणाऱ्या अपघाता बाबत प्रतिज्ञा देत मार्गदर्शन केले.
उद्घाटन सत्राचे आभार डॉ.निरुपमा ढोबळे यांनी मानले तर सूत्रसंचालन मंजुषा कौटकर यांनी केले.
यानंतर सुप्रसिद्ध गझलकार श्री सूर्यकांत मुनघाटे यांच्या अध्यक्षतेत कवी संमेलन संपन्न झाले. यावेळी मंचावर प्रा. भगवंत शोभणे आणि श्री.नागोराव सोनकुसरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कवी संमेलनामध्ये प्रज्ञा खोडे, डॉ. सुनंदा जुलमे, डॉ.अपर्णा ढोबळे, डॉ शील बागडे, ज्योती ताम्हणे,डॉ. राजेश काळे, अरुणा भोंडे, प्रतिभा सहारे, डॉ.सीमा पांडे, माधुरी सोनारे, किरण मोरे, स्मिता किडले, विजया मारोतकर, प्रा. भगवंत शोभणे, नागोराव सोनकुसरे यांनी आपल्या रचना सादर केल्या. अध्यक्ष सूर्यकांत मुनघाटे यांनी सर्व कवितांचा आढावा घेत आपली सुरेख रचना सादर केली. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. माधव शोभणे यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे आभार विजया मारोतकर यांनी मानले. डॉ. सोपानदेव पिसे, विकास गजापुरे यांचे सह मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे सदस्य, सेवादल महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत मराठी राजभाषा गौरव दिन प्रचंड उत्साहाने संपन्न झाला.