पाचोरा (गुरुदत्त वाकदेकर) :
शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, नागरिक असुरक्षिततेच्या भावनेत जीवन जगत आहेत. शहराच्या इतिहासात प्रथमच गावठी कट्टे सापडण्यासारखे गंभीर गुन्हेगारी प्रकार घडत आहेत. पोलीस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे गुन्हेगारांना खुलेआम अभय मिळत आहे. तसेच, कोट्यवधी रुपयांच्या हेराफेरी प्रकरणी कोणतीही चौकशी वा कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत, पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक पवार यांच्या तात्काळ बदलीसाठी आणि त्यांच्या कार्यक्षमतेची चौकशी करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे, असा इशारा पत्रकार संदीप महाजन यांनी दिला आहे.
१) शहरात गावठी कट्टे सापडण्याच्या घटनांनी नागरिक भयभीत
२) गुन्हेगारांशी पोलीसांचे मैत्रीपूर्ण संबंध – गुन्हेगारीला मिळतेय अभय ठराविक पोलीसांचे मोबा. नंबरचे कॉल डिटेल तपासले तर गुन्हेगार , अवैध धंदेवाले यांच्याशी किती सलोख्याचे संबंध आहेत हे सहज लक्षात येईल
३) नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही किंवा विलंब केला जातो
४) तक्रारींच्या नोंदीत पक्षपात – ठराविक लोकांना संरक्षण
५) सामान्य नागरिकांना त्रास, तर गुन्हेगारांना आश्रय
६) आर्थिक व्यवहारातून ठराविक लोकांचेच प्रश्न सोडवले जातात
७) महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष – बेपत्ता मुलीच्या शोधासाठी कुटुंबियांकडून पैसे आणि वाहनसह इतर खर्च वसूल करणे
८) निर्भया पथकाचे अपयश – महिलांना संरक्षणाचा अभाव
९) अवैध दारू, जुगार अड्डे, सट्टे , चक्री व इतर गुन्हेगारी प्रकारांवर पोलीसांची मूकदर्शक संमती
१०) पोलीस दलातील अंतर्गत शिस्तभंग – कायद्याची खिल्ली उडवली जाते. ठरविक पोलीस व अधिकाऱ्यांवर आशिर्वाद, विरोध करणारे व कलेक्शन न आणणाऱ्या पोलीसांवर कारवाई करणे किंवा त्यांचे विरोधात वरिष्ठांकडे रिपोर्ट पाठवणे
११) पाचोऱ्यात कोट्यवधी रुपयांची हेराफेरी झाल्याचे विद्यमान आमदार किशोरआप्पा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्पष्ट केले होते. या प्रकरणी अद्याप कोणतीही चौकशी नाही, तपास नाही, कारवाई नाही!विशेष म्हणजे या प्रकरणात जितेंद्र आहिरे नामक दलीत समाजाचा एक प्राध्यापक बेपत्ता आहे तरी त्याच्या तपासावर प्रगती शून्य. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या कार्यकाळात मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांना वाचा फुटली असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.
गंभीर गुन्ह्यांच्या तपासात ढिलाई
आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ
तपास प्रक्रिया लांबवून अन्यायकारक वर्तन. यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीवर नागरिकांचा विश्वास उडाला आहे. यासाठी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तात्काळ बदली करावी.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
कोट्यवधी रुपयांच्या हेराफेरी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
जर प्रशासनाने तातडीने योग्य कारवाई केली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकार संदीप महाजन यांनी दिला आहे. विविध राजकीय पक्षाचे मान्यवर, विविध सामाजिक संघटना व जागृत नागरिकांनी आपले अंतर्गत मतभेद, गटतट बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभाग घेऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा, असे आवाहन महाजन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.