*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अशी माझी मायबोली…*
बोलायला भारी गोड
अशी माझी मायबोली
काना मात्रा अनुस्वार
वेलांटीने सजलेली
स्वल्पविरामाने मिळे
कशी अल्पशी विश्रांती
येता हा पूर्णविराम
वाक्य संपतसे अंती
गोडी माझ्या मराठीची
असे अवीट हो भारी
साऱ्या जगाला सांगते
ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी
तुकयाच्या अभंगाची
काय सांगावी महती
गाथा तुकोबारायाची
सर्वा मुखोद्गत होती
दासबोधातील श्लोक
उपदेश करणारे
जगण्याचे मर्म सारे
सहजची सांगणारे
नादमाधूर्याने अशी
ओतप्रोत भरलेली
तिला कशाची ना तोड
अशी माझी मायबोली
@अरुणा गर्जे
नांदेड