*साहित्यलेणी प्रतिष्ठानतर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा*
फोंडा – कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे सर्व साहित्यविधांत लेखन करणारे साहित्यिक. त्यांनी कविता, कथा, कादंबरी, नाटक, निबंध असे सर्व प्रकारचे साहित्य लीलया हाताळले. त्यांच्या बहिणीचा कुसुमचा अग्रज म्हणजे मोठा भाऊ हेच नाव त्यांनी कवितालेखनासाठी घेतले. डॉ. बिभिषण सातपुते यांनी कुसुमाग्रजांच्या लेखनातील सर्व प्रकार उलगडून दाखविले. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची उकल डॉ. सातपुते यांनी केली. साहित्य अकादमी व ज्ञानपीठ असे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले. परंतु सर्वांभुती दयाभाव हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते, त्यांच्या कणा या प्रसिध्द कवितेतून ते संकटग्रस्तांना धीर देत हे दिसून येते, असे डॉ. सातपुते म्हणाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मी जोग होत्या. मराठीतून बोला, संभाषण करा, घरीही मराठीतच बोला, तरच नव्या पिढीला मराठीची सवय लागेल, असे त्या म्हणाल्या. डॉ. अनिता तिळवे यांचेही भाषण झाले. त्यांनी कुसुमाग्रज व सावरकरांच्या जीवनकार्याची माहिती दिली. साहित्यलेणी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चित्रा क्षीरसागर यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश क्षीरसागर यांनी आभार मानले. कविता आमोणकर, बबिता नार्वेकर, मंजिरी वाटवे, माधुरी उसगावकर, नूतन दाभोळकर, महेश पारकर यांनी मान्यवरांना पुष्प प्रदान केले.
या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ नाट्यकर्मी नितीन कोलवेकर यांनी यावेळी शिरवाडकरांच्या नटसम्राटमधील एक स्वगत सादर केले. आयुष्यभर ताठ मानेने जगलेला नटसम्राट गणपतराव बेलवलकरांचे ते प्रसिध्द स्वगत होते. यावेळी झालेल्या काव्यसंमेलनात विश्वनाथ जोशी यांनी कुसुमाग्रजांनी अनुवादित केलेल्या मेघदुतातील काही श्लोक सादर केले. ज्येष्ठ साहित्यिका दया मित्रगोत्री, ज्येष्ठ साहित्यिक बिभिषण सातपुते, कविता आमोणकर, नूतन दाभोळकर, दीपा मिरिंगकर, अनंत काजरेकर, सचिन मणेरीकर यांनी कणा ही कविता साभिनय सादर केली., मंजिरी वाटवे, डॉ. अनिता तिळवे, महेश पारकर, माधुरी उसगावकर, वसुधा तारी, बबिता नार्वेकर, रेशम झारापकर, प्रकाश क्षीरसागर व चित्रा क्षीरसागर, श्रुती हजारे, माधुरी उसगावकर, रेशम झारापकर आदींनी कुसुमाग्रजांच्या कविता पेश केल्या. या कार्यक्रमाला प्रसिध्द उद्योजक जयंत मिरिंगकर, अनिता काजरेकर, हेमंत खांडेपारकर, विनोद तिळवे आदी रसिक उपस्थित होते. ज्येष्ठ कीर्तनकार सुहासबुवा वझे यांना पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.