सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित वक्तृत्व स्पर्धा इन्सुली येथे उत्साहात संपन्न.!
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि विद्या विकास मंडळ, इन्सुली यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व पत्रकार तथा नाट्यकर्मी स्वर्गीय प्रवीण मांजरेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी ‘सावंतवाडी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा – 2025’ गुरुवारी इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी संपन्न झाल्या.
या स्पर्धेत मोठ्या गटात चिन्मय शांताराम असणकर (राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी) हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून त्याला मान्यवरांच्या असते रोख रक्कम 1500/ प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर लहान गटात स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव येथील विद्यार्थिनी मनवा प्रसाद साळगावकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला रोख रक्कम 1111/ प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच मोठ्या गटात द्वितीय क्रमांक आरपीडी शाळेची अदिती अवधूत राजाध्यक्ष हिने पटकावला तर तृतीय क्रमांक आर्या गणपती सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) हिने पटकावला त्यांना अनुक्रमे रोख रक्कम 1001/ सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व रोख रक्कम 777/ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
लहान गटात द्वितीय क्रमांक भाईसाहेब सावंत विद्यालय माजगाव येथील विद्यार्थिनी गायत्री शशिकांत सावंत हिने पटकावला तिला रोख रक्कम 777/ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तर तृतीय क्रमांक प्रणिता गोविंद सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) या विद्यार्थिनीने पटकावला. तिला रोख रक्कम 555/ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण सौ. गौरवी पेडणेकर व गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.
यावेळी उपस्थित सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातले संस्कार निरंतर जपणे काळाची गरज आहे. कारण आपल्या भावी आयुष्याला शालेय जीवनात असलेल्या विविध स्पर्धेतून मिळालेले संस्कार कलाटणी देत असतात. म्हणूनच वक्तृत्व, कथाकथन, वादविवाद व क्रीडा स्पर्धेत सतत भाग घेत रहा. यश मिळो अथवा न मिळो मात्र स्पर्धेसाठी आपले सर्वस्व पणाला लावा, एक दिवस नक्की यशाला गवसणी घालाल, असा मौलिक सल्ला सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी दिला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अशोक सावंत, सचिव गुरुनाथ पेडणेकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, पत्रकार संघाचे सहसचिव विनायक गांवस, सदस्य पत्रकार सचिन रेडकर, दिव्या वायंगणकर, पत्रकार शैलेश मयेकर, संजय पिळणकर, सौ. सुविधा केरकर, आदी उपस्थित होते. या स्पर्धेत सावंतवाडी तालुका तालुक्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
*प्रवीण मांजरेकर यांसारखे अनेक व्यक्तिमत्व घडतील!- विनायक गांवस*
यावेळी बोलताना युवा पत्रकार विनायक गांवस म्हणाले, स्वर्गीय पत्रकार व रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित या स्पर्धेतून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, ही गोष्ट निश्चितच भविष्यात उपयुक्त ठरणारी आहे. या स्पर्धेतून प्रवीण मांजरेकर यांसारखे अनेक व्यक्तिमत्व घडतील असा आशावाद आहे. भविष्यातही प्रवीण मांजरेकर यांच्या गुणांच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्री. गांवस यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा पालव यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार संजय पिळणकर यांनी केले.
दरम्यान यावेळी विद्या विकास मंडळ,इन्सुलीचे सचिव पदी निवड झाल्याने ज्येष्ठ पत्रकार तथा जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांचा सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन स्नेह सत्कार करण्यात आला.