You are currently viewing मराठी साहित्य समृद्ध आहेच, वाचनाने स्वतःलाही समृद्ध बनवा – प्राचार्य डॉ. अर्चना पत्की

मराठी साहित्य समृद्ध आहेच, वाचनाने स्वतःलाही समृद्ध बनवा – प्राचार्य डॉ. अर्चना पत्की

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय व श्री एम. पी. शाह कला आणि वाणिज्य महिला कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि श्री जी. ओ. शाह ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी ‘मराठी साहित्य समृद्ध आहेच, वाचनाने स्वतःलाही समृद्ध बनवा’ या विषयावर विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “आपल्या भाषेची श्रीमंती आपणच वाढवली पाहिजे. त्यासाठी अगदी लहान-लहान गोष्टींपासून सुरुवात करावी. अनेक पुस्तकांचा आढावा घेताना ‘मन में है विश्वास’ या पुस्तकाने कसे भारावून टाकले, हे विद्यार्थिनींनी आपल्या स्वानुभवातून मांडले.”

कार्यक्रमाची सुरुवात ‘महाराष्ट्र गीताने’ झाली. कवीवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थिनींनी ‘म…मराठीचा’ हे पथनाट्य सादर केले.

साताऱ्यावरून विशेष उपस्थित असलेले डबिंग कलाकार गणेश चिंचकर यांनी विद्यार्थिनींना मराठीत करिअरच्या संधी समजावून सांगितल्या आणि आवाजाच्या गमतीजमती उलगडून दाखवल्या. उपप्राचार्य डॉ. अवनिश भट्ट यांनी सर्वांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या.

ग्रंथालयाच्या गायत्री हार्डीकर यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा व मराठी भाषेच्या अभिजाततेचा आढावा घेत वाचनवृद्धीवर विद्यार्थिनींशी संवाद साधला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. संगीता सिंग यांनी विंदा करंदीकरांची ‘नजर रोखून नजरेमध्ये’ ही कविता सादर केली.

प्रा. किरण जाधव यांनी विदर्भी भाषेतील प्रहसन सादर केले, तर डॉ. हिरालाल भोसले यांनी धनंजय कीर लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चरित्रात्मक पुस्तकाच्या वाचनाने स्वतःमध्ये कसा बदल घडला, हे विद्यार्थिनींसमोर मांडले.

डॉ. माधवी साठये यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भाषाशुद्धी चळवळीचा आढावा घेत पर्यायी मराठी शब्दांविषयी माहिती दिली तसेच ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातील विचार मांडले.

मानसशास्त्र विभागाच्या वेदश्री भागवत यांनी अनेक पुस्तकांचा आढावा घेत आपल्या स्वरचित कवितेचे सादरीकरण केले. प्रा. शरद गिरमकर यांनी विश्वास पाटील लिखित ‘संभाजी’ आणि ‘पानिपत’ या ऐतिहासिक कादंबऱ्यांचे सखोल विश्लेषण केले.

प्रा. प्रशांत देशपांडे यांनी सदानंद देशमुख लिखित ‘बारोमास’ कादंबरीचा आढावा घेतला. काही विद्यार्थिनींनीही आपल्या कविता सादर केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी शेटये-तुपे, प्रा. नेहा भोसले आणि प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केले. ग्रंथालयाच्या ग्रंथपाल अश्विनी प्रभू यांनी समारोपप्रसंगी आपली भूमिका मांडली तसेच ग्रंथालयाने मराठी कवितासंग्रहाचे प्रदर्शनही आयोजित केले होते. सदर कार्यक्रमात प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा