गेली अनेक वर्षे राष्ट्रवाद, हिंदुत्व अशा शब्दांचा वापर फक्त आणि फक्त राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी वारंवार केला जातो हे मान्य करायलाच पाहिजे. या मंडळीने अंतर्मुख होवून सावरकरांचा राष्ट्रवाद आणि हिंदुत्व समजून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाच नाही. सगळेच राजकीय पक्ष स्वांतत्र्यसाठी ज्या क्रांतिकारकांनी धगधगत्या होमकुंडात स्वत:ला झोकून दिले त्यांचा देदीप्यमान इतिहास मोडतोड करुन आपल्या सोयीनुसार मांडण्याचा प्रयत्न करतात.. पण हा इतिहास बदलणारे अजून तरी जन्माला आलेले नाहीत.
सगळ्यात जुन्या राष्ट्रीय पक्षाचे नेते आणि विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधींना तर सावरकर आणि त्यांचा क्रांतिकारक इतिहास निदान या जन्मात तरी समजणे कठीण आहे. सावरकारावर टिका म्हणजे साक्षात सूर्यावर थुंकण्याचा अश्लाघ्य प्रकार आहे त्यामुळे देशाच्या पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणाऱ्या राहुलजीनी शांत डोक्याने सावरकर समजून घेणे त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या हिताचे आहे. दुसऱ्या बाजूला जे सावरकरांचा क्षणिक राजकीय लाभासाठी सावरकरांचा उपयोग करतात त्याना सावरकर समजले असे समजण्याचे कारण नाही.
सावरकरांचे अवघे आयुष्य म्हणजे एक राष्ट्रभक्तिचा यज्ञ होता. हा यज्ञ १८८३ ते २६ फेब्रुवारी १९६६ पर्यंत धगधगत होता. सावरकरांनी ही स्वातंत्र्यप्राप्ती साठिची होमकुंड भारतात, विलायतेत,तर कधी मार्सेलीस बंदरावर, अंदमानच्या काळोखी तुरूंगात तर कधी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत कायम पेटत ठेवली.
सावरकरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेताना भारतरत्न स्व. अटलजी म्हणतात, ” सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तपस्या, सावरकर म्हणजे बलिदान, सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे तथ्य, सावरकर म्हणजे तारुण्य, सावरकर म्हणजे तलवार, सावरकर म्हणजे धगधगते होमकुंड ”
एक क्रांतीकारी लेखक, चिंतनशील कवी, एखाद्या महाकाव्याचा नायक शोभावे अशा संस्कृत भाषेतील त्यांच्या कविता, गोऱ्या लोकांनी त्यांच्या लिखाणावर बंदी आणली तरी तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठडीत भिंतीवर कविता लिहीणारे सावरकर पुन्हा होणे नाही.
सत्ता प्राप्तीसाठी वाटेल त्या तडजोडी करून आपण आणि आपल्या कुटुंबियासाठी जनतेच्या पैशात सतत सोनेरी पिंजऱ्यात जगण्याची चटक लागलेल्या आजच्या राजकीय नेत्यांना सावरकर समजणे आणि सावरकरांचा राष्ट्रवाद आणि हिंदुत्व पचवणे फार अवघड आहे. भारताची जातीयवादी ओळख ही राष्ट्रवाद जपूच शकत नाही हा सावरकरांचा विचार होता. भौगोलिक एकता आणि भारतीय संस्कृती यामुळेच राष्ट्रवाद टिकू शकतो यावर ते ठाम होते. भाषा हे राष्ट्रीय ऐक्य टिकून ठेवण्याचे प्रभावी माध्यम आहे, त्यासाठी संस्कृत आणि हिंदी या दोन भाषानां प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांचे मत होते. धर्मसुधारणा आणि मानवतावाद यावरही ते ठाम होते. राजनैतिक राष्ट्रवादा पेक्षा सांस्कृतिक राष्ट्रवाद हाच देशाला आत्मनिर्भर बनवू शकतो. हिंदू व मुसलमान हे दोन्ही धर्म सांस्कृतिक धर्म आहेत मात्र यांचे नेतृत्व करणाऱ्या स्वार्थी व पांखडी नेत्यांनी या दोन्ही धर्माना एका वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न केल्याने त्यावेळी देशाचे ऐक्य धोक्यात आले. हिंदूत्व हा नुसता शब्द नाही तर तो या देशाचा वैभवशाली इतिहास आहे. राष्ट्रवाद हा धर्मावर नाही असे सावरकरांचे ठाम मत होते.
१९०४ मध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी अभिनव भारतची स्थापना केली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ मध्ये सावरकराना वाटले की ज्या उद्देशाने अभिनव भारतची स्थापना केली तो उद्देश संपला म्हणून त्यांनी १९५२ मध्ये अभिनव भारत बंद केले, नाहीतर आजकाल सत्ता प्राप्तीसाठी अनेक पक्षाचे नेते आपली दुकाने सुरु ठेवतात नाही चालली तर चालणाऱ्या दुकानात सहभागी होतात.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे होमकुंड धगधगते ठेवण्यात सावरकरांचे फार मोठे योगदान आहे. त्यांची लेखणी म्हणजे तलवार. १८५७ चे स्वातंत्र्य समर हा सावरकरांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे एक धगधगती पेटती मशाल. ही मशाल घेऊन हजारो तरुण या पुढच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय झाले. त्यांच्या अंत:करणात असलेली स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्याचे काम या सावरकरांच्या लेखनाने केले.
उद्या २६ फेब्रुवारी क्रांतिकारक सावरकरांची पुण्यतिथी. हे मातृभूमी, तुजला सर्वस्व वाहिले.. पण अखंड भारताचे स्वप्न अधुरे राहिले.. हे शल्य उराशी घेऊन सावरकरांनी शेवटच्या दिवसात अन्न त्याग केला.. आणि २६ फेब्रुवारी सकाळी दहा वाजता हे धगधगते अग्नीकु़ंड शांत झाले.. सावरकर जगणे सोडूनच द्या सावरकर समजणे आजच्या नेत्यांना खूपच कठीण आहे… आणि त्यांना समजवून सांगण्याचा मुर्खपणाही कुणी करणार नाही.. आजचे नेते हे फक्त सत्तेसाठी जगणे… सावरकरांचे जगणे हे मातृभूमीसाठी होते..
… स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन!