*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अरे संसार संसार*
अरे संसार संसार
मांडियला मनोभावे
केला निर्धार मनाने
पार करेन स्वभावे ॥१॥
नाही घ्यायची माघार
येवो कित्येक संकटे
गेले सामोरे त्यांनाही
भाव ठेविले चोखटे॥२॥
अरे संसार संसार
केली प्रार्थना सदैव
मन स्थिर होण्यासाठी
धरियला महादेव ॥३॥
नाही केला राग लोभ
इर्षा नाही बाळगली
वाट चालले सत्याची
वाचा स्नेहाची राखली ॥४॥
आता आहे समाधान
यथाशक्ती केले दान
दिला घास भुक्या मुखी
पाळियली तुझी आण ॥५॥
अरे संसार संसार
आता इतुके मागणे
सूर शेवटचा गोड
तानपुरी जुळवणे॥६॥
*राधिका भांडारकर*