*विद्यार्थ्यांनी उपयुक्त कौशल्ये आत्मसात करावीत*- श्री.विजय रावराणे
वैभववाडी
भविष्यातील शिक्षणाचे स्वरूप हे तंत्रज्ञानाधारित असणार आहे. आजच्या युगात तंत्रज्ञान हा शिक्षणाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उपयुक्त कौशल्ये आत्मसात करावीत. डिजिटल युगात स्पर्धा वाढत आहे, आणि त्याला सामोरे जाण्यासाठी तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष अनुभव आणि कौशल्याधारित व्हावे, यासाठी अशा प्रशिक्षण शिबिरांची गरज आहे असे प्रतिपादन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री.विजय रावराणे यांनी केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील
भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने आणि PM-USHA (Soft Component) अंतर्गत पाच दिवसीय ‘ICT Tools’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ स्थानिक समिती अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहसचिव श्री.विजय रावराणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे, प्रशिक्षक श्री. सचिन रावराणे, प्रभारी प्राचार्य डॉ.एन.व्ही गवळी आणि भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.आय.चौगुले उपस्थित होते. विद्यार्थी आणि शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण अधिक प्रभावी करण्यास प्रवृत्त करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे असे प्रास्ताविकात डॉ.एम आय.चौगुले यांनी सांगितले. आनंदीबाई रावराणे आणि महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून तसेच रोपट्याला पाणी अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रभारी प्राचार्य डॉ. एन.व्ही. गवळी यांनी तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण अधिक प्रभावी आणि परिणामकारक करण्यासाठी ICT Tools चा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी PM-USHA अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत या प्रशिक्षण शिबिरातून सर्व सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांना नवे ज्ञान मिळेल असा विश्वास व्यक्त केला. विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे यांनी अंगभूत कौशल्य आणि कलांचे महत्त्व स्पष्ट करुन प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही नैसर्गिक कौशल्ये आणि सृजनशीलता असते. त्यांना योग्य दिशा दिली तर त्याचे उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. ICT Tools हे केवळ तांत्रिक ज्ञान देण्यासाठी नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांना वाव देण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन कल्पना मांडता येतात, नवीन कौशल्ये आत्मसात करता येतात आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवता येतो.
सहसचिव विजय रावराणे यांनी भविष्यातील शिक्षणाच्या स्वरूपावर प्रकाश टाकत तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात सज्जनकाका रावराणे यांनी उपक्रमांचे कौतुक करत, विद्यार्थ्यांनी आधुनिक साधनांचा योग्य वापर करून स्वतःला ज्ञानाने समृद्ध करावे, असे आवाहन केले.
या प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. एन. ए. कारेकर यांनी केले तर आभार डॉ. डी. बी. शिरगांवकर यांनी व्यक्त केले.