(नगरविकास विभागाचे अधिकारी/कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, सविता आश्रम व आंगणेवाडी ग्रामस्थांचा मोहिमेत सहभाग)
मालवण :
आंगणेवाडीतील श्री भराडी देवीची यात्रा २२ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी भराडी देवीचे दर्शन घेतले. जत्रेच्या निमित्ताने व्यावसायिकांद्वारे हॉटेल, गृहपयोगी साधने, कपडे, भांडी, खेळाचे साहित्य, मालवणी खाजा, शीतपेय असे शेकडो स्टॉल उभारण्यात आले होते. श्री देवी भराडी जत्रोत्सवाला लाखोंचा जनसागर आणि शेकडो स्टॉल इत्यादीमुळे अर्थातच मोठ्या प्रमाणात कचराही निर्माण झालेला होता. तरी जत्रा संपन्न झाल्यानंतर तेथील परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना मा. पालकमंत्री नितेश राणे तसेच जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिल्या होत्या त्यानुसार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी आंगणेवाडी येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत मालवण नगरपरिषद, सावंतवाडी नगरपरिषद, वेंगुर्ला नगरपरिषद, कणकवली नगरपंचायत, देवगड-जामसंडे नगरपंचायत व कुडाळ नगरपंचायतचे एकूण ४५ कर्मचारी सहभागी झाले. सोबतच कचरा वाहतुकीसाठी नगरविकास विभागाकडून एकूण ७ घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. सकाळी ९:३० वाजता मालवण नगरपरिषद, सावंतवाडी नगरपरिषद, वेंगुर्ला नगरपरिषद, कणकवली नगरपंचायत, देवगड-जामसंडे नगरपंचायत व कुडाळ नगरपंचायतीचे कर्मचारी स्वच्छतेसाठी आवश्यक सामुग्रीसह आंगणेवाडी येथे हजर झाले. त्यानंतर मालवण नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक महेश परब, सावंतवाडी नगपरिषद स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर, कणकवली नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष श्री सिताराम आंगणे व बीळवस ग्रामपंचायत, ग्रामसेवक श्री युगल प्रभुगावकर यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष श्री सिताराम आंगणे व बीळवस ग्रामपंचायत, ग्रामसेवक श्री युगल प्रभुगावकर यांनी कचरा संकलनासाठी आवश्यक पिशव्या व झाडू तसेच मास्क उपस्थितांना देऊन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत सविता आश्रमचे स्वयंसेवक, दादासाहेब वराडकर कॉलेज, कट्टाचे ६० विद्यार्थी, आर पी बागवे हायस्कूल चे २० विद्यार्थी, प्राथमिक शाळा, वरवडेचे ५ विद्यार्थी तसेच आंगणेवाडी ग्रामस्थही सहभागी झाले.
प्रारंभीच स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर, विनोद सावंत, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर यांनी संपूर्ण परिसराचा आढावा घेऊन उपस्थितांचे वेगवेगळ्या गटात विभाजन करून त्यांना वेगवेगळे परिसर वाटून दिले. जमा झालेला कचरा पिशव्यांमध्ये भरून नगरपालिकांच्या घंटा गाड्यांतून ग्रामपंचायत व आंगणेवाडी विकास मंडळाने नेमून दिलेल्या जागेत एकत्र जमा करण्यात आला. कचरा वाहतुकीसाठी जिल्ह्यातील नगरपालिकांकडून ७ गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या या गाड्यांमधून कचरा नियोजीन स्थळी नेण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत सुमारे ५ टन पेक्षा जास्त कचरा संकलित करण्यात आला असून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
*स्वच्छता मोहिमेत सहभागी सर्वांना अल्पोपहार व जेवण व्यवस्था*
आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई यांच्याकडून स्वच्छता मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी तसेच नागरिक यासर्वांसाठी सकाळी ११ वाजता अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर दुपारी २ वाजता मंडळाकडून सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सकाळी १० वाजलेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत चाललेल्या स्वच्छता मोहिमेत उन्हाची तीव्रता लक्षात घेता मंडळाकडून सर्वांना पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.
*श्री भराडी देवीचा प्रसाद व पेन वाटप करून मानण्यात आले सर्वांचे आभार*
स्वच्छता मोहीम संपल्यानंतर आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष श्री बाळा आंगणे, श्री कमलाकर आंगणे, श्री समीर आंगणे, श्री दिनेश आंगणे, श्री प्रसाद आंगणे, श्री सचिन आंगणे, श्री बाळकृष्ण आंगणे यांनी स्वच्छता मोहिमेस उपस्थित सर्वांना श्री भराडी देवीचा प्रसाद व पेन वाटप करून सर्व सहभागी नगरपालिकांचे कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक व विशेष करून नगरविकास विभागाच्या सहकार्याबद्दल जिल्हा सह-आयुक्त विनायक औंधकर, मालवण नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे व सर्व सहभागी पालिकांचे मुख्याधिकारी यांचे आभार मानले.
*मा. पालकमंत्री श्री नितेश राणे व जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांचे विशेष आभार*
दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या श्री देवी भराडी जत्रोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी केलेल्या सहकार्याबद्दल तसेच स्वच्छता मोहिमेत जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना तसेच कचरा संकलनासाठी घंटागाड्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आंगणेवाडी विकास मंडळ व आंगणेवाडी ग्रामस्थांकडून मा. पालकमंत्री श्री नितेश राणे व जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.