सिंधुदुर्गनगरीत मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतीगृह मंजुर करा
माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
मंत्रालयात भेट घेत दिले निवेदन : अन्य विकास कामांचीही मागणी
सावंतवाडी
सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे मागासगवर्गीय मुले व मुलींसाठी शासकीय वसतीगृह बांधण्यात यावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा भाजपचे पदाधिकारी अंकुश जाधव यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे केली. मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन त्यांनी याबाबतचे निवेदन त्यांना सादर केले. याचबरोबर इतरही काही विकास कामांची त्यांनी मागणी केली आहे.
ना. नितेश राणे यांना सादर केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग नगरी येथे मागासवर्गीय मुला मुलींचे वसतिगृह व्हावे यासाठी गेली १० वर्षे आपण सातत्याने प्रयत्नशील असून आहे मात्र त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे गरीब व होतकरु विद्यार्थी व विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सदर मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हे वसतिगृह मंजूर करावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेतून मुख्य रस्ता ते ओरोस सिध्दार्थ नगर रस्ता डांबरीकरण, कसाल बौध्दवाडी येथे नवीन समाज मंदिर बांधकाम करणे, रानबाबुंळी सिध्दार्थनगर ता. कुडाळ येथे नवीन समाज मंदिर बांधकाम करणे तसेच गावराई मुख्य रस्ता ते बौध्दवाडी नवीन रस्ता करणे व वायंगणी बौध्दवाडी ता. मालवण येथे नवीन बौध्द विहार बांधणे अशा कामांची मागणी देखील त्यांनी यावेळी ना. नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
