You are currently viewing चैतन्याचे गमक

चैतन्याचे गमक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चैतन्याचे गमक*

 

फांदी वरती पक्षी गातो

मधुर स्वरांनी मना झुलवतो

रूप पाहुनी सुंदर त्याचे

चैतन्याचे गमक वाटतो ॥१॥

 

धवल लाट ती येत किनारी

शुष्क वालुका ओली करते

स्पर्श तिचा तो पदास होता

आनंदाची लहर दाटते ॥२॥

 

एकच तारा तो आभाळी

बेचैन मना धीर वाटतो

सांगावे की गुपित तयाला

अंतर्यामी दीप लागतो ॥३॥

 

रानफूल ते गवतावरचे

स्वच्छंद कसे छानच झुलते

चिंता नसते त्या सुकण्याची

असेच जगणे ऊर्जित करते ॥४॥

 

क्षितिजावरती भास्कर जातो

पहाट येण्या पुन्हा उद्याची

ऋतुचक्र असे हे सृष्टीचे

जाण मेख ही चैतन्याची.॥

 

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा