You are currently viewing सशक्त आणि उज्वल भारताच्या निर्मितीसाठी संतांचे साहित्य प्रेरणादायी

सशक्त आणि उज्वल भारताच्या निर्मितीसाठी संतांचे साहित्य प्रेरणादायी

*सशक्त आणि उज्वल भारताच्या निर्मितीसाठी संतांचे साहित्य प्रेरणादायी*- राष्ट्रसंत स्वामी गोविंद देवगिरी*

वैभववाडी

विश्ववंदिता भारत देशाच्या निर्माण प्रक्रियेत संतांचे साहित्य हे वेदाचे सार असून ते जगाच्या कल्याणासाठी प्रेरक आहे असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष पू. स्वामी गोविंद देवगिरी यांनी केले. पुण्यातील मोशी येथील वेदश्री तपोवन इथे दासबोध सखोल अभ्यास फौंडेशन तर्फे आयोजित प. पू. स्वामींचा अमृत महोत्सवी सोहळा व अयोध्येतील वेदपाठ शाळेसाठी निधी अर्पण समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी समर्थ रामदास स्वामी आणि उपक्रमाच्या संयोजक पूजनीय अक्का वेलणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ओमकार जोशी यांनी सद्गुरु स्तवन या दासबोधातील समासाचे वाचन केले. पू.स्वामी गोविंद देवगिरी यांचा परिचय सौ.वृंदा जोगळेकर यांनी करून दिला. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन तर्फे स्वामी गोविंद देवगिरी यांचा शाल, श्रीफळ, वस्त्र, मानपत्र आणि रुपये अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा निधी देऊन सत्कार करण्यात आला. ७६ दिव्यांनी त्यांचे औक्षण करण्यात आले. दासबोध सखोल अभ्यास परिवारातर्फे देण्यात आलेल्या या निधीचा विनियोग अयोध्येतील नियोजित समर्थ रामदास स्वामी वेदपाठ शाळेसाठी करणार असल्याचे स्वामी गोविंद देवगिरी यांनी सांगितले. या कार्यक्रमात भागवतातील गीते ( लेखिका निर्मलाताई देवस्थळी), दासबोधातील माणिक मोती (शीलाताई देशमुख), समर्थांची पत्रे आणि समर्थांचे उपदेशपर काव्य (विजय लाड ) तसेच गीतेतील नवविधा भक्ती ( पुष्पा प्रभुणे)आणि ज्ञानबोध (विश्वनाथ प्रभुणे) या ग्रंथांचे प्रकाशन स्वामी गोविंद देवगिरी यांचे हस्ते करण्यात आले. फाउंडेशनचे संचालक विजय लाड यांनी प्रस्तावनेत संत रामदास
स्वामींचा दासबोध जनमानसात सर्व दूर पोहोचवण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन दासबोध सखोल अभ्यास मंडळाने अपार परिश्रम घेतल्याचे सांगितले. प.पू. स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी समर्थांचे दासबोधातील विचार इतर ग्रंथा पेक्षा वेगळे व प्रभावी कसे हे अनेक संदर्भ देऊन सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. अपर्णा वांगीकर, सौ. मेधा कुलकर्णी, सौ.रंजना पाटील, अनिल वाकणकर, आनंद जोगळेकर, बाळासाहेब पाटील, सौ.माधवी पानसे, सौ. विनया आणि विनायक विद्वांस , विवेक थिटे यांनी परिश्रम घेतले. संतोष सप्रे यांनी सूत्रसंचालन केल. सौ. प्रीति जोशी यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण व देश, विदेशातील साधकांसाठी थेट प्रक्षेपण केले तर सौ. अंजली खळदकर यांनी ” पावन भिक्षा दे दो राम” ही प्रार्थना गायली. सौ. शुभदा थिटे यांनी आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा