You are currently viewing छत्र गुलमोहराचे…

छत्र गुलमोहराचे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*छत्र गुलमोहराचे….*

 

सात जून उलटला. मे महिन्यातच मेघांनी छत्र

धरले होते. कधी ऊन कधी सावली असा त्यांचा खेळ चालू होता. जून म्हणजे जीवघेणा महिना.

जीवाची तलखी तलखी होत होती. घामाच्या धारा नि रूसलेला वारा. सारे स्तब्ध. पान हलत नव्हते. जीव कसा पाणी पाणी होत होता. कधी

एकदा तो बरसेल व जीवाला शांती मिळेल असे

झाले होते.

 

बाहेर ऊन, घरात घाम, कामे सुचत नव्हती.

अखेर बारा जूनला त्याने मौन सोडले व तो सुसाट सैरावैरा धावू लागला. आकाश गडबडले.

पक्षी फडफडले, वृक्ष डोलू लागले. अहाहा, किती सुखद वारा.. ये रे बाबा ये.. जीव कसा

आतुरलाय रे तुझ्या साठी! आले आले रे पावसाचे थेंब आले.. साड साड साड साड..

झाडे डोलती माड लिंब … धरा भिजली झाली

चिंब.. पोटात शिरले पाऊस थेंब, खरपूस सुटला

माती गंध.. जगच सारे झाले धुंद… जिकडे तिकडे पसरे सुवास..क्षणभर थांबून सुटले नि:श्वास, भरून घेतला पोटी सुवास, तडातडा

नाचला पाऊस, चिंब धरा फिटली हौस.. झाडे

झाडे वेली खूपच भिजल्या, वाऱ्यासंगे खूप नाचल्या, पावसाला वाहिली त्यांनी फुले, कळी

वाऱ्यावरती डुले.. जिकडे तिकडे सैराट पाणी,

रस्ते धुतले गात गाणी, प्रतिबिंबे ती पडली पाण्यात, हसली झाडे माड्या अंगणात, स्वच्छ

आरशात पाहिली मुखे, वादळ वारे आणि धुके..

पाण्यात नाचली चांदणं फुले, सैरावैरा झाली मुले, पावसात नाचली थयथयथय, मनात त्यांच्या कसले भय?

 

असा गोंधळ घालून पाऊस विसावला नि बघतो

तर काय? गुलमोहोराच्या डोक्यावरील सारे फुलांचे छत्र त्याच्या पायाशी तळाला साऱ्या रंगसंगतीसह हसत हसत गालीचा बनून विसावले होते नि म्हणत होते, बा पावसा आलास तू, बरे केलेस रे.. अरे ह्या टळटळीत

उन्हात ग्रीष्माची पानगळ होऊन सारीच झाडे बोडकी होऊन बसली असतांना मी एकटाच

फुलांची रंगबिरंगी छत्री डोक्यावर घेऊन नेत्रसुख

देत, साऱ्या सृष्टीला सुखवत एकटाच लढत होतो रे त्या जीवघेण्या टळटळीत दुपारीशी. नाही म्हणायला पळस पांगारा होते रे जोडीला, लाल फुलांच्या ज्वाला उधळत जणू! अशा या जाळणाऱ्या ग्रीष्मात देवाने आम्हा तिघांनाच

फक्त हे वरदान दिले आहे काय रे, सृष्टीला व

समस्त मानवजातीला दृष्टी सुख देण्याचे!

आता मी निवांत गार गार पाण्यात पहुडतो बघ.

उन्हाने भाजलेय रे सारे अंग…

 

दोन महिने किती भयंकर ऊन झेलतो मी! पण किती सुंदर दिसतो ना मी? ती लाल गुलाबी शेंदरी भडक फुले व तो भला मोठा फक्त नि

फक्त फुलांचा डोलारा केवढा सुंदर दिसतो नि केवढे नेत्रसुख देतो साऱ्यांना! मला व माझ्या

सौंदर्याला भुलून टळटळीत उन्हातही माझ्या

सावली खाली क्षणभर विसावला नाही असा

माणूस विरळाच! आणि इथेच माझ्या जन्माचे सार्थक होऊन जाते. भर दुपारी मी ऊन झेलत

असलो तरी वाटसरू व पक्षी सुखावतात, माझ्या सावलीत क्षणभर का होईना विसावतात, मला

डोळे भरून पाहतात, म्हणतात “ किती सुंदर आहे हा गुलमोहोर”! बस्स, मला आणखी काय हवे? मी झाड म्हणून जन्मल्याचे सार्थकच झाले

की! सेवा करणे हाच तर आमचा धर्म नि कर्म.

भर उन्हात जेव्हा तुम्हाला खरोखर सावलीची

गरज असते तेव्हाच मी लालगुलाबी छत्र धरतो तुमच्या डोक्यावर, अतिशय देखणे व सुंदर असे

आता तू आलास ना तुझी गारेगार झारी घेऊन.

आता माझे काम संपले. माझी सेवा संपली.

आता मी ही नि:ष्पर्ण होणार नि तुझ्या झडीत

मग पुन्हा मोहरणार, फक्त पर्ण पिसारा घेऊन

डोलणार. आणि ग्रिष्म येताच पुन्हा मी रंग पांघरणार, नेहमी सारखे…

बरंय् मित्रा… तू आता आलाच आहेस तर..

काढता पाय घेऊ नकोस बरं…अरे, तू येतोस

म्हणून तर आम्ही उभे राहतो ना…

बरंय्, येतो आता….

 

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा