आठवी आर्थिक गणना जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न
सिंधुदुर्गनगरी
आठवी आर्थिक गणना एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. यामध्ये नियुक्त प्रगणकांमार्फत घरोघरी जावून विहीत नमुन्यात माहितीचे संकलन केले जाणार आहे. आर्थिक गणनेच्या माहितीचा वापर केंद्र व राज्य शासनाला औद्योगिक विकासाच्या नियोजन व धोरणांसाठी उपयुक्त ठरणार असल्यामुळे नागरिकांनी योग्य माहिती देवून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
केंद्र शासनातर्फे सन 2025-26 मध्ये राष्ट्रव्यापी आठवी आर्थिक गणना होणार आहे. आठवी आर्थिक गणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व कामाच्या सनियंत्रण व समन्वयासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची बैठक जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे.
या बैठकीला जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक अ. कुलकर्णी, उप मुख्यकार्यकारी अधिकारी किशोर काळे, जिल्हा नियोजन अधिकारी यंशवंत बुधवाले, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, जिल्हा माहिती अधिकारी मुकूंद चिलवंत, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, नगरपालिका प्रशासन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. कुलकर्णी यांनी आर्थिक गणनेची पार्श्वभूमी, उद्दिष्ट, गणनेसंदर्भांतील विविध संकल्पना तसेच गणनेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असणारी ढोबळ कार्य इ. बाबीबद्दल माहिती दिली. या बैठकीमध्ये आठवी आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम, जिल्हास्तरीय समन्वय समितीची कार्यकक्षा, सर्व तालुकानिहाय व गावनिहाय कुटुंबांच्या संख्येनुसार ग्रामीण भागासाठी Enumeration block व शहरी भागासाठी UFS block ची सुनिश्चिती करणे, प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यासारख्या विषयावर चर्चा करण्यात आली.