*काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम लेख*
*”जयजय रघुवीर समर्थ”*
१)समर्थांनी कोणत्या गुरूंना सदगुरू म्हणून नाकारले आहे?
मनुष्य जन्माला आल्या पासूनच नवनवीन गुरुच्या सान्निध्यात असतो.पहिला गुरु – आई बाळाला सर्व यावे म्हणून ती कष्ट घेते तिथेच पहिली शिक्षणाची सुरुवात होते.मग वडील आसपासचे परिचीत, थोडे मोठे झाल्यावर शाळेतील शिक्षक,मित्र, मैत्रिणी,समाज ह्यांच्या कडुन अनुभव रुपी ज्ञान घेत तो मोठा होतो. नंतर उदरनिर्वाह चालवण्यासाठी व्यावसायिक शिक्षण घेतो.ज्यांच्या कडुन आतापर्यंत त्याने शिक्षण घेतले ते गुरुच असतात.पण हे सर्व गुरु भौतिक जगात जगण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण देतात. कारण त्या शिक्षणात साहित्य,संगित, व्यायाम, व्यवसाय (सुतार ,लोहार,न्हावी, धोबी,वैद्य इत्यादी) कामांचा समावेश असतो. पण देहबुद्धी सोडून आत्मज्ञान कोणी दिलेले नसते.
‘शिकविती भरण्या उदर, ते सद्गुरू नव्हेती’ असे समर्थ स्पष्टपणे सांगतात.
तसेच संसारातील दु:खापासुन मुक्तता व्हावी म्हणून, स्वतःच्या उदरभरणासाठी, लोकांना , जादूटोणा, चमत्कार,अंगारे धुपारे,नेमधर्म,यज्ञयाग,बळी,भुतपिशाच्य यांच्या आश्रयाने फसवतात तेही गुरू नव्हेत.कारण त्यात फळाच्या अपेक्षाचा स्वार्थ दडलेला असतो.सामान्य लोक अशा भोंदू गुरुंना अलौकिक शक्ती लाभली आहे असे समजून फशी पडतात व फसवले जातात शेवटी त्यांच्या हाती काही लागत नाही. शारीरिक, मानसिक व आर्थिक दृष्ट्या ते पुर्ण नागावले जातात . म्हणून अशा भोंदूच्या अंगी गुरू व्हायची लायकी नसते तर ते सद्गुरू कसे होणार?
“ऐसे गुरु आडक्याचे तीन मिळाले तरी
त्यजावे”असे समर्थ ठासुन सांगतात . कारण असे गुरु पैशासाठी योग्य मार्गदर्शन करत नाहीत त्यामुळे शिष्याचे नुकसानच होते.बुध्दिभ्रष्ट होते ,मोक्ष साधून जन्ममरणातून सुटका होत नाही.म्हणून ते गुरू नव्हेत.
सदगुरु म्हणजे नक्की कोण? हे समजावे म्हणून समर्थ प्रथम वाईट गोष्टी म्हणजे काय हे समजावून देतात.
२)”मुख्य सद्गुरूचे लक्षण ,आधी पाहिजे विमळ ज्ञान|
निश्र्चयाचे समाधान, स्वरुप स्थिती|
ह्या एका श्लोकात समर्थांनी सद्गुरू कसा असावा ते सांगितले आहे.
सद्गुरुला सर्वंकष, सर्वांगीण, सखोल व शुध्दज्ञान हवे,जेणे करून तो निश्चय पुर्वक शिष्यांचे समाधान करू शकेल.व शिष्याची स्वरुप स्थिती परखडपणे त्याला दाखवून योग्य मार्गदर्शन करेल. तो खरा सद्गुरू होय.
अशा सद्गुरूपाशी देहबुद्धीतला अहं सोडून शिष्य लिन होतो.
थोडक्यात वासना कमी करून, करुणा,मानवता,ईश्वरी अनुसंधान व भक्ती या मार्गाने नेणारी व्यक्ती म्हणजै सद्गुरू.
सद्गुरू मुळे शिष्यात आमुलाग्र बदल होतो. समाधान हाच खरा परमार्थ आहे याचा निश्चय झाला की, मन:शांती मिळते.म्हणून असा सद्गुरू मिळणे आवश्यक आहे.
सद्गुरू कसा हवा तर ,भिडस्तपणा न ठेवता शिष्याचे दोष सांगणारा,परखडपणे शिष्याला योग्य मार्गदर्शन करणारा. वृत्ती उदासीन,अनासक्त, स्वधर्म आचार पाळणारा,ज्ञानी, उच्च जातीचा,नाना विद्या अंगी असणारा, कृपावंत असा सद्गुरू असावा.तरच ब्रह्मज्ञान व आत्मज्ञान शिष्याला मिळू शकेल.सद्गुरू कडुन चमत्कार घडला तरी तो अकल्पित व दैवयोगाने घडून मानव किंवा जीवसृष्टीच्या कल्याणासाठी असेल.कारण अशा सद्गुरूपाशी असणारे दैवी सामर्थ्य हे ‘सिद्धि’ प्राप्त झाल्याने आलेले असते.अशी नवविधा भक्ती व ज्ञान असणारा सद्गुरू हा सर्वश्रेष्ठ होय.
*प्रतिभा फणसळकर*