You are currently viewing नवसाला पावणारी आंगणेवाडीची श्री देवी भराडी

नवसाला पावणारी आंगणेवाडीची श्री देवी भराडी

 

मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक उत्सव शनिवारी २२ फेब्रुवारीला होत आहे. आंगणेवाडीतील आंगणे कुटुंबाची ही देवी असली तरी देखील हा उत्सव सर्वांनाच खुला असतो. दरवर्षी देवीला कौल लावल्यानंतर उत्सवाची तारीख निश्चित केली जाते. त्यासाठी धार्मिक विधीही केला जातो. तळकोकणातील मालवण तालुक्यात मसुरे हे गाव असुन गावात आंगणेवाडी ही वाडी आहे. आंगणेवाडीतील भराडी देवीची ख्याती राज्यभर आहे. देवीला बोललेले नवस पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. ही देवी भरडावर असल्याने देवीचे नाव भराडी देवी असे ठेवण्यात आले आहे. भराड म्हणजे उघडे माळरान असा अर्थ आहे. देवीच्या आजुबाजूचा परिसर हा माळरान आहे त्यामुळे देवीला भराडी देवी हे नाव पडले आहे.

नवसाला पावणारी देवी असल्याने कोकणासह, महाराष्ट्र, कर्नाटक आणि देशातल्या इतर भागातूनही भाविक इथे देवीच्या उत्सवाला येतात आणि देवीचे दर्शन घेतात. आंगणेवाडी भराडी देवीच्या उत्सवासाठी कोकणातील जे नागरिक मुंबईला नोकरीसाठी राहतात ते मोठ्या प्रमाणात गावाकडे दाखल होतात आणि देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात. ‘कोकणातील प्रतिपंढरपुर’ अशी आंगणेवाडीची ख्याती आहे.

आंगणेवाडी देवीचा उत्सव केवळ दीड दिवस चालतो. दीड दिवसांच्या या उत्सवात तब्बल पाच ते सात लाख भाविक हजेरी लावतात. भराडी देवीचा नैवेद्य हा खास असतो. आणि उत्सवात सहभागी असणाऱ्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ मिळतो. आंगणे कुटुंबातील बायका हा नैवेद्य अबोल राहून करतात.
विविध पक्षाचे राजकीय लोक, कलाकार देखील या उत्सवाला हजेरी लावतात. विविध व्यापारी आणि व्यावसायिक या उत्सवात आपली दुकाने थाटतात. त्यामुळे खरेदी साठी देखील लोकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. व्यावसायिकांची या दीडच दिवसांत करोडोंची उलाढाल होते.

दरवर्षी आंगणेवाडी उत्सवासाठी जिल्हा प्रशासन तारेवरची कसरत करत आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावते. आंगणेवाडी भराडी देवीच्या उत्सवासाठी जाण्यासाठी मुख्य मार्ग वगळता चारही बाजूचे रस्ते अरुंद आणि खड्डेमय होते. परंतु जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर नाम.रवींद्र चव्हाण आले तेव्हाच “सिंधुदुर्ग बदलतोय” असे बॅनर जिल्हाभर लागले आणि आंगणेवाडी कडे जाणारे चारही बाजूचे रस्ते पक्के झाले, डांबरीकरणाने चकचकीत करण्यात आले. परिणामी रस्त्यावर होणारी गर्दी आटोक्यात आली आणि त्यामुळेच नाम.रवींद्र चव्हाण हे नाव आजही आंगणेवाडीकडे जाणाऱ्या भाविकांच्या मुखात सदोदित घेतले जाऊ लागले.
आंगणेवाडीची जत्रा म्हणजे आंगणे यांचा उत्सव..! यावेळी सेवाभावी परोपकारी व्यक्ती म्हणून ओळख असलेले उद्योगपती कै.राजन वामनराव आंगणे आणि मुंबईत आदी परिसरातून जत्रोत्सवास येणाऱ्या प्रत्येकाला दर्शन सुलभपणे व्हावे यासाठी प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधून प्रसाद घेण्याचा आग्रह करणारे कै.शशी आंगणे आणि खऱ्या अर्थाने ज्यांची गावाशी नाळ जुळलेले सामाजिक कार्यकर्ते कै. नरेश आंगणे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विसरणे कदापि शक्य नाही. आज त्यांची अनुपस्थिती प्रत्येकाला जाणवते आहे आणि “राजन, शशी आणि नरेश आंगणे आता कधीच भेटणार नाहीत” अशी चर्चा मुंबईतून आंगणेवाडीत दाखल झालेल्या चाकरमान्यांमध्ये होताना ऐकू येत आहे. त्यामुळे कै.राजन, कै.शशी आणि कै.नरेश यांच्या आठवणींना आंगणेवाडी भराडी देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने उजाळा येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा