जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील युवांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने त्यांना प्रतिवर्षी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन २०२४-२५ साठी जिल्हा युवा पुरस्कारसाठी ३१ मार्चपर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
राज्याचे युवा धोरण २०१२ मधील शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जिल्हा युवा पुरस्कार तीन जणांना दिला जाणार आहे, यात युवक, युवती व नोंदणीकृत संस्था यांचा समावेश असणार आहे. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमाती व जनजाती, आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य, शिक्षण, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या इ. बाबत पुरस्कार वर्षापासून गत तीन वर्षात केलेली कार्यकामगिरी या पुरस्कारांसाठी विचारात घेतली जाईल.
अर्जदाराने अर्ज, आवश्यक कागदपत्रे व केलेल्या कार्याचे सबळ पुरावे बंद लिफाफ्यामध्ये ३१ मार्च, २०२५ पर्यंत कार्यालयात सादर करणे आवश्यक असणार आहे. अर्जाबाबत अधिक व माहिती करीता क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, मो.क्र. ९७६६९६५९९६ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, सिंधुदुर्गनगरी येथे कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच विहित मुदतीत प्रस्ताव अर्जदाराने या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.