उपवडे (गुरुदत्त वाकदेकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपवडे गावचे सुपुत्र आणि भजन क्षेत्रातील नावलौकिक प्राप्त कलाकार सुरेश गोविंद राणे यांचे २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण उपवडे ग्रामस्थ मंडळ, चेंबूर (मुंबई) आणि संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
सुरेश राणे हे मूळचे उपवडे, पोस्ट वसोली, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथील रहिवासी होते. ते केवळ संगीतकारच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय कार्यरत होते. भजन संप्रदायात त्यांचे मोठे योगदान होते. ते प्रसिद्ध भजनकार श्री. श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य होते, तसेच त्यांचे उजवे हात मानले जात होते. त्यांनी अनेक शिष्य घडवले आणि भजन सेवा करत राहिले.
सुरेश राणे यांनी आपल्या भजनसेवेचा श्रीगणेशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातच केला. शिक्षण पूर्ण करून मुंबईत नोकरीला गेल्यानंतरही त्यांनी संगीत आणि भजनसेवेची परंपरा अखंडपणे चालू ठेवली. ते कोणाच्याही सुख-दुःखात सहभागी होत असत. गावातील आणि मुंबईतील विविध कार्यक्रमांत त्यांची हजेरी असायची. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते लहान-मोठ्या सर्वांसोबत आपुलकीने वागत.
सुरेश राणे यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण उपवडे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या सहवासात असलेले शिष्यगण, ग्रामस्थ आणि भजन मंडळाचे सदस्य या धक्क्यात आहेत. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने अनेकांना आनंद दिला होता. त्यामुळे त्यांचे निधन हे गावासाठी आणि संगीत क्षेत्रासाठी कधीही भरून न येणारं नुकसान आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडं असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना उपवडे ग्रामस्थ मंडळ, चेंबूर आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीतप्रेमींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे, असे पावणाई प्रासादिक भजन मंडळ, चेंबूर, पावणाई देवी प्रासादिक भजन मंडळ, घाटकोपर, पावणाई सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तसेच राणे यांचे प्रिय शिष्य विजय भरडे यांनी सांगितले आहे.