दर्पणकरांच्या विचारांचा वारसा जपत पत्रकारिता करणे हीच खरी आदरांजली : गजानन नाईक
सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
सावंतवाडी
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मभूमीत आपण पत्रकारिता करीत आहोत हे आपले भाग्य आहे. अतिशय दूर्मिळ अशा पोंभुर्ले गावांत जन्म घेऊन देखील त्यांनी पत्रकारीतेत केलेले कार्य अनन्यसाधारण असेच आहे. बाळशास्त्रींनी केलेली पत्रकारिता ही सामाजिक बांधिलकी जपत व समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी केली. त्यांच्या विचारांचा वारसा जपत पत्रकारिता करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष जेष्ठ पत्रकार गजानन नाईक यांनी केले.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून येथील पत्रकार कक्षात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर म्हणाले, समाजातील अन्यायाविरोधात आवाज उठविणे हे बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा सांगणाऱ्या आपल्यासारख्या पत्रकारांचे आद्य कर्तव्य आहे. ही भूमी लढवय्या पत्रकारांची आहे. समाजाच्या हितासाठी अन्याविरोधात लेखणीद्वारे हा लढा कायम ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यादृष्टीने आपली पत्रकारिता जपा व स्वतंत्र भारतामध्ये आपलं लेखणीचं स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी कार्यरत रहा, असे मौलिक विचार अण्णा केसरकर यांनी मांडले.
यावेळी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे म्हणाले, समाजाचे हित जपण्यासाठी आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारिता करीत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी देखील घेणे गरजेचे आहे. सर्वांनी आपला आहार, नियमित व्यायाम व नियमित चेकअप या गोष्टी अत्यावश्यक आहेत. प्रत्येकाने आपली फिटनेस जपा, असा सल्ला डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले. यावेळी दिवंगत पत्रकार प्रवीण मांजरेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. सुत्रसंचालन गुरुनाथ पेडणेकर यांनी तर आभार माजी तालुका अध्यक्ष राजेश मोंडकर यांनी मानले.
यावेळी जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, गजानन नाईक, रमेश बोंद्रे, मोहन जाधव, हर्षवर्धन धारणकर, मयुर चराठकर, रामचंद्र कुडाळकर, गुरुनाथ पेडणेकर, नरेंद्र देशपांडे, सचिन रेडकर, उमेश सावंत, जतिन भिसे, प्रवीण परब, अजित दळवी, सीमा मठकर, मंगल नाईक, मंगल कामत, अनुजा कुडतरकर यांसह पत्रकार उपस्थित होते.