*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मेघ मल्हार*
(अक्षरे १६ यती ८ वर)
पावसाची ओली सय,गेली मनात रूजून
मेघ मल्हाराचे सूर , कानी घुमती अजून ।।धृ।।
भरलेल्या आभाळाने, दिली अचानक हूल
अधीर मनाला लागे, नव प्रेमाची चाहूल
लाजताना समजली, ती भाषा नजरेतून
मेघ मल्हाराचे सूर ,कानी घुमती अजून ।।१।
धडधड होता उरी, तनू झाली रोमांचित
कळी उमलली जणू भिजताना अवचित
हळुवार स्पर्श ओले ,किती गेलो बावरून
मेघ मल्हाराचे सूर ,कानी घुमती अजून ।।२।।
चमकली वीज नभी, बिलगले घाबरून
लहर गेली हलके , दोघांच्याही अंगातून
लाज गाली उमटली,तू घेतलीस टिपून
मेघ मल्हाराचे सूर, कानी घुमती अजून।।३।।
जरी होतो आडोशाला ,भिजलो नखशिखांत
रेंगाळली सांज ओली, हवाहवासा एकांत
कोसळला पाऊसही, असा भान हरपून
मेघ मल्हाराचे सूर, कानी घुमती अजून ।।४।।
**************************
डॉ. सौ.मानसी पाटील
मुंबई