30 जानेवारी 2021 रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेअहमदनगरला राळेगणसिद्धी येथे यांनी शेतकऱ्या प्रश्नावर उपोषणाचा इशारा दिला पूर्वी मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी अण्णां आता जुने व्हिडीओ प्रसारित करणार आहेत. त्यामुळे आता अण्णा देखील ‘लावरे तो व्हिडीओ’ असंच म्हणणार आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे हमीभाव द्यावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगास स्वायत्तता द्यावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आग्रही आहेत. मात्र आधी काँग्रेसने, तर आता भाजपने अण्णांना आश्वासनाच्या पलीकडे काहीही दिलेले नाही, असा आरोप अण्णांनी केलाय. 2011 मध्ये अण्णा दिल्लीत उपोषणाला बसले होते. त्यावेळी संपूर्ण देश अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाला होता. त्याची मोठी किंमत काँग्रेसला चुकवावी लागली. मात्र त्यावेळी भाजप नेत्यांनी त्याचा फायदा घेत अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर अण्णांच्या मागण्या आम्ही पूर्ण करू, असं आश्वासन दिलं. मात्र पुढे सरकार येऊनही भाजपने देखील अण्णांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केलं.
*मोदींसह या 9 प्रमुख नेत्यांना आश्वासनांची आठवण करुन देणार*
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह 2014 च्या निवडणुकीपूर्वी अण्णा हजारे यांच्या कार्याचे कौतुक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन यांच्यासह 9 प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रियांचे व्हिडीओ आहेत. ते सोशल मीडियावर व्हायरल केले जाणार आहेत. त्यामुळे येत्या 30 जानेवारीच्या आंदोलनांची पूर्ण तयारी अण्णांनी केल्याचं दिसतंय.
*‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पत्र पाठवलं, सरकारकडून त्याचं उत्तरही नाही’*
“2011 मध्ये मी उपोषणाला बसलो. त्यावेळी माझ्या आंदोलनाचं कौतुक करण्यात आलं. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मागण्यांबाबत पत्र पाठवलं. त्याचं उत्तरही दिलं जात नाही. त्यामुळे भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या भूमिका आणि कौतुकाचे व्हिडीओ जनतेला दाखवणार आहेत,” अण्णा हजारे म्हणाले. याबाबत स्वतः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे माहिती दिली. त्यामुळे ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून अण्णांची जनजागृती सुरू होणार असल्याचं दिसतंय.
*भाजप नेते बागडे, कराड, महाजन आणि विखे पाटलांचे प्रयत्न अपयशी*
अण्णा हजारे 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करणार आहेत. त्या आधीच अण्णांची समजूत काढण्यासाठी विधानसभेच माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड, माजी मंत्री गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी भेट घेवून अण्णांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अण्णा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आधीच दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर सरकारने तोडगा काढला नाही. त्यातच आता अण्णा देखील उपोषण सुरू करणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारबरोबर विरोधकांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.