अटक न झाल्यास शिक्षक भारती ‘धरणे आंदोलन करणार!
तळेरे
न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे ता.कुडाळ या शाळेतील अनिल सहदेव काटकर या शिक्षकाला शाळेच्या आवारात एका विद्यार्थ्याचा नातेवाईक असलेल्या रोहित चंद्रकांत मडव या माथेफिरूने कायदा हातात घेऊन शिक्षकाला मारहाण केली. याबाबत रितसर लेखी तक्रार कुडाळ पोलीस स्टेशन येथे दाखल झाली आहे. या घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले तरी, सुद्धा सदर युवकावर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही.इतकी गंभीर घटना असताना संबंधितावर त्वरीत कारवाई न झाल्यास “प्रजासत्ताक दिनी” शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटना कुडाळ पोलिस स्टेशन समोर ‘धरणे आंदोलन’ छेडणार असल्याचे पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात शिक्षक भारती संघटनेने म्हटले आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, समाजात चुकीचा संदेश जाईल अशा घटना घडल्यानंतर समाजात दहशतवाद पसरला जातो.
शैक्षणिक क्षेत्रात दशहत पसरवणाऱ्या या घटनेचा ‘शिक्षक भारती संघटना’ तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे,असे शिक्षक भारतीने दिलेल्या निवेदनात नमूद करून कायदा हातात घेणाऱ्या माथेफिरू युवकाला तात्काळ अटक करण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.जर सदर युवकाला अटक न झाल्यास 26 जानेवारी ‘प्रजासत्ताक दिन’ शिक्षक भारती संघटनेच्यावतीने कुडाळ पोलिस स्टेशन समोर “धरणे आंदोलन” करणार आहे असा इशाराही शिक्षक भारतीच्या वतीने दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.यासंदर्भात शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी प्रभारी पोलीस उपअधीक्षक श्रीम. संध्या गावडे यांच्याकडे लेखी निवेदन दिले असून संदर्भात सिंधुदुर्गाचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचीही भेट घेऊन त्यांनी यासंदर्भात कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
*शाळेनेही दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन:-*
दरम्यान याप्रकरणी जाभवडे शाळेचे मुख्याध्यापक एस.एस.सावंत यांनी ही शाळेतर्फे पोलिस अधीक्षकांकडे लेखी निवेदन देत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याप्रसंगी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर,
जांभवडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.एस सावंत, विद्यालयाचे सर्व शिक्षक, सिंधुदुर्ग जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघाचे श्री संजय पेंडुरकर,श्री वाजंत्री आणि अध्यापक संघाचे श्री टी.के पाटील, श्री अजय शिंदे, विजय मयेकर अन्य पदाधिकारी उपस्थित होते.