*काव्यनिनाद साहित्य मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम लेख*
*गड किल्ले आणि मी..!*
जन्मापासून मरेपर्यंत जो राजा गडाच्याच सानिध्यात राहिला व राजधानीचे ठिकाण गडावर असणारा हा जगातील एकमेव राजा.
(१ किलोमीटर काय किंवा समोरच्या दुकानात तून काही आणायचे झाले तर वाहनच हवे असे म्हणणारी आताची पिढी) पाहिली की, वाटते मावळे कसे रोज चढत असतील गड? पायाखालची वाट म्हणावी तरी जंगलाने वेढलेली,सरळसोट चढण असलेली पायवाट, गगनाला भिडेल असे वाटणारे कडे, अनेक प्रकारची श्वापदे,किटक पशुपक्षी यांचेच सानिध्य.सगळ्या गोष्टींची हल्लीच्या तुलनेत प्रतिकूल . तरी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन पार पाडलेली राजांची कामगिरी व अथक परिश्रम करीत साथ देणारे मावळे
एकेक पैलू विचारात घेतला तरी जीव घाबरा होतो. सर्वच विचार करण्यापलिकडचे आहे असे वाटते.जिथेआपली विचार करण्याची शक्ती अपुरी पडते ते प्रत्यक्ष साकारलेले मुर्तीमंत पुढे उभे ठाकलेले पाहून अचंबित होतो कौतुकाला अन वर्णनाला तर शब्दच सापडत नाहीत.
प्रचंड बांधकामाच्या शिला कशा वर नेल्या असतील ?३५० वर्षे ऊन,वारा,पाऊस यांना तोंड देत हे इतिहासाचे हे मुक साक्षीदार अजूनही अस्तित्व टिकवण्यासाठी झुंजत आहेत
शिवनेरीवर राजांचा जन्म.छोटे शिवाई मंदिर तिचा प्रसाद ही धारणा म्हणून नाव शिवाजी ठेवले.
तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, राजगड स्वराज्याची पहिली राजधानी.प्रतापगड अफजलखान भेट,जीवघेण्या संकटातून महाराज बचावले व अफजलखानाचा खात्मा केला.लाल किल्ला शाहिस्तेखानाचा वेढा त्याने बोटे गमावली.
घोरपडीच्या साह्याने कोंढाण्यावर चढले हे एक अद्भुतच ! कोंढाणा जिंकला तानाजी मालुसरे सारखा पराक्रमी सिंह गेला नाव सिंहगड ठेवले.
पुरंदरगडावर मिर्झाराजां व दिलेरखान यांना मराठ्यांनी कडवी झुंज दिली. पण महाराजांनी जनतेचे हाल व प्राण वाचविण्यासाठी २३किल्ले देऊन तह केला.राजांच्या शब्दांखातर येसाजी कंकाने हत्तीविरुद्ध झुंज घेतली.
पन्हाळगडाला सिद्धी जोहारने वेढा दिला. शिवा काशिदने पुढे मृत्यू दिसत होता तरी प्रति शिवाजी बनून शत्रुला हुलकावणी दिली- विशाळगडावर पोचेपर्यंत बाजीप्रभू देशपांडे यांनी खिंड लढवली व तोफेचे आवाज ऐकुन राजे गडावर पोचल्याची खात्री झाल्यावर प्राण सोडले.
आग्राच्या कैदखान्यात राजांच्या जागी मदारी मेहत्तर झोपला ती एकप्रकारे मृत्यूशय्याच होती.
अरे कसल्या मातीतून ही माणसे उपजली असतील? १०० मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा सुखरूप राहिले पाहिजे ह्या धारणेतून कडवा प्रतिकार. एकनिष्ठता व
एकमेकांवरील गाढा विश्वास,ह्या बळावरच मावळे गमिनी काव्याने अर्धी लढाई जिंकत होते.
(आता डोळ्यासमोर माणुस मरत असेल तर मदतीला ही न जाता व्हिडीओ शुटिंग करतात.)
एकेका गडाची कहाणी म्हणजे मावळे आणी राजे यांचा काळजाचा ठोकाच.सज्जनगड तर गुरु समर्थ रामदास स्वामीच्या समाधीची जागा,
ह्या जिवंत इतिहासाने लोहगड सोडून सर्व गड मी पाहिले.
त्रंबक /ब्रह्मगिरी लोहगड /भोरपा सुधागड भूपाळगड रुद्रमाळ /वज्रगड
/वासोटा घागरगड हरिश्चंद्रगड खेळणा/ विशालगड अशी नाव वाचली तरी विरश्री संचारते.
नळदुर्ग, खांदेरी, उंदेरी,जंजिरा, सुवर्णदुर्ग,विजयदुर्ग सिंधुदुर्ग,पद्मदुर्ग
हे जलदुर्ग अरबी समुद्रात महाराजांनी बांधले
मिरज,बत्तीस शिराळ, जिंजी, शिरवळ ,कैलासगड यशवंतगड, बहादूरगड येथील भुईकोट किल्ले.हे तीनही ठिकाणावरील किल्ले म्हणजे स्वराज्याची दौलत.
११वीत असताना ब.मो.पुरंदरे यांच्या बरोबर पुरंदर,रायगडची सहल केली होती .प्रत्येक ठिकाणाचे त्यांंच्या तोंडून ऐकलेले वर्णन म्हणजे चालता बोलता इतिहास अजूनही रायगड म्हटले की, अजुनहि अंगावर शिरशिरी येते.व आयुष्यातील सुंदर पान डोळ्यासमोर उभे राहते. रायगड हे एक माझ वेडच आहे आणि मीही ज्यांना घेऊन गेले त्यांच्या समोर बाबासाहेबांनी सांगितलेला त्याठिकाणाचा इतिहास उभा केला.बाजारपेठ ते जगदीश्वराच्या मंदिरापर्यंतचा रस्ता,महाराजांच्या ३००व्या पुण्यतिथी निमित्त पंतप्रधान इंदिरा गांधी येणार होत्या तेव्हां माझ्या बहिणीच्या वर्गातील सर्व मुलामुलींनी तयार केला आहे.
आम्ही मैत्रीणी एकदा गंमत म्हणून तुझी अंतिम इच्छा काय असेल?असे विचारत होतो. त्यावर माझे उत्तर होते रायगडवर मरण यावे आणि आले नाही तर माझ्या प्रेताला तरी तेथे फिरवून आणून मग अग्नी द्या.बहुधा त्याच मानसिक ओढीने असेल
कर्मधर्मसंयोगाने पतीची बदली महाड,मोर्बा व माणगांव येथे झाली ११वर्षे रायगड परिसरात असल्याने २१ वेळा चालत रायगडला जाता आले.सातारला रोज अजिंक्य तारा चढण्याचा सराव येथे उपयोगी आला. व पुण्यात आल्यावर मैत्रीणींना घेऊन पहिली रायगड रोपवे सहल अनुभवली.
त्या रायगडचे वर्णन काय करावे.चढतानाच दिसतात रायगडचे उत्तुंग कातळ, बुरूज, माची, टकमक टोक व त्यातून जाणारी वाट.
गड चढल्यावर भवानी देवीचे मंदिर, हत्ती तलाव व पडझड झालेले तीन मनोरे दिसतात. पायऱ्याचे दगडी जीने शाबूत असल्याने वर जाऊन रायगडचे सौंदर्य न्याहाळता येते. पहिल्यांदा सात मजल्याचे तीन मनोरे होते .आता २-३ मजलेच उरले आहेत.मनोरे आणि बुरुज यांचे ढासळते बांधकाम बघून खरोखरच फार वाईट वाटते आताच्या लोकांना ते बांधता येईल का नाही याची शंका वाटते इतके अप्रतिम बांधकाम आहे .
महारांजाची राजधानी म्हणजे, दादु इंदुरीकर बांधलेला एक एक वाडा म्हणजे अप्रतिम बांधकामाचा नमुनाचा आहे. शिवाजी महाराजांचा राजवाडा त्या मागे, सात राण्यांचे ओळीत बांधलेले सातमहाल याचे वैशिष्ट्य म्हणजे पाठीमागे जोडून असलेले पायखाने (हल्लीच्या भाषेत अँटच संडास बाथरूम)राणीवशासाठी आंघोळीला तलावाकडे जाण्यासाठी स्वंतत्र पगदंडी.
ते महाल पाहताना वाटते सातही राण्या लढाईहून आलेल्या राजांना ओवाळायला हातात तबक घेऊन उभ्या आहेत.
नगारखाना व त्यामागे राज्यसभा व महाराजांच्या सिहांसनाची जागा त्याचे वैशिष्ट्य म्हणजे दरबारात कुणी कुजबुजले तरी ते महाराजांना ऐकू येत असे.
पुतळाबाई जेथे सती गेल्या त्या जागेवर असलेल्या सतीच्या खांबाला नमस्कार करून आपण बाजारपेठेत पोचतो.
घोड्यावरून माल खरेदी करता यावा म्हणून बांधलेली दुतर्फा उभी असलेली ११-११ दुकानांची जोतीच आता शिल्लक आहेत.पण नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे पाणी वाहून जाण्यासाठी भक्कम बांधलेली दुकाना लगत असलेली गटारे.
मध्यभागी महारांजाचे छत्री धारी सिहांसन,त्यावर विराजमान झालेले राजे.(दरबारात सिहांसन न ठेवता आता इथे केलेली महाराजांची स्थापना मात्र खटकते असो )
त्यानंतर जगदिश्वराचे काळ्या कभिन्न दगडात उभारलेले देखणे मंदीर
त्याच्याच थोडे पुढे गेलेकी, चिरविश्रांती घेत असलेल्या महाराजांची समाधी. तिथे आपोआपच नतमस्तक व्हायला होते. अनामिक अशी अनुभूती जाणवते.संपूर्ण शरीरात स्पंदनाच्या लहरी जाणवतात,मी खिळल्यासारखी स्तब्ध होते. कुठेही जावेसे वाटत नाही.
थोडे खाली उतरले कि, वाघजाई चे मंदिर व दक्षिण दरवाजा दिसतो.पण बहुतेक तिकडे कुणी फिरकत नाहीत.
एका बाजुला टकमक टोक, दुसरी कडे हिरकणी बुरूज गडाला भक्कम तटबंदी. त्या तटाकडेने आतील बाजुनेचालण्यासाठी रस्ता बुरजावर तोफा ठेवायला जागा.टकमक टोकावरून खाली पाहिल तरी धडकीच भरते.कडेलोट म्हणजे काय असेल? याची कल्पना येते.
गद्दार व फितुरांना ज्या काळकोठडीत टाकत ती जागाही अंगावर काटा उभा करते.खोल वर काळ्या नितळ पाषाणात बांधलेली चारी बाजुने बंदी स्त फक्त वरून १-२ माणसांना आत टाकता येईल अशी उघडी जागा. सरपटणारा प्राणीही त्यातून वर येऊ शकणार नाही.
धान्य साठवण्यासाठी गोदाम,धान्याचे कोठार आहे तिथे अजूनही तांदूळ सापडतात.
घोड्याचे तबेले, हत्ती खाना, पाण्याची सात टाकी,राजवाडे सगळच वैभव अप्रतिम पण पडझड झालेले. एक गुहा आहे त्यातून जाणारा रस्ता प्रताप गडला निघतो आता ते पुर्ण बंद आहे.चारी बाजूंनी उभै असलेले पण दुरवर दिसणारे महाराजांचे गडकिल्ले.
काशीबाईची समाधी शोधण्यासाठी संपूर्ण गड पालथा घातला पण आढळली नाही. खरतर पुरंदरे असतानाच प्रत्येक ठिकाणी पाट्या लावून थोडी माहिती लिहायला हवी होती म्हणजे पुढील पिढी साठी उपयुक्त ठरले असते.पण त्याची कोणाला कदर ना सरकारला चिंता
असो .लेखनाला मर्यादा घालावी म्हणून थांबते.
प्रत्येकाने एकदा तरी गडाला भेट द्यावीच.
*प्रतिभा फणसळकर*