बांदा-दोडामार्ग रस्त्यावर आडाळी येथे गतिरोधक बसवा, अन्यथा उपोषण – पराग गावकर यांची मागणी;
ग्रामस्थांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकामला निवेदन…
दोडामार्ग
दोडामार्ग रस्त्यावर आडाळी येथे गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा इशारा आडाळी सरपंच पराग गांवकर यांनी दिला आहे. श्री. गांवकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांदा – दोडामार्ग रस्त्यावर आडाळी माऊली मंदिर, एमआयडीसी गेट व मोरगाव बस थांबा येथे गतिरोधकांची आवश्यकता आहे. गेली अनेक वर्षे गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिक करत आहेत. माऊली मंदिर येथे धोकादायक अवघड वळण असून दोडामार्ग च्या दिशेने तीव्र उतार आहे. त्यामुळे वाहने गतीने येतात. याचं परिसरात बस थांबा, प्राथमिक शाळा,मंदिर व औद्योगिक क्षेत्र आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परिणामी अपघाताचा धोका लक्षात घेता माऊली मंदिर, एमआयडीसी गेट, मोरगाव बस थांबा येथे गती नियंत्रणासाठी गतिरोधक किंवा थर्मो प्लास्टिक रंम्ब्लर बसविण्याची मागणी श्री. गांवकर यांनी केली आहे. गेली दोन वर्षे जिल्हाधिकारी व बांधकाम विभाग यांच्याकडे श्री. गांवकर यांनी निवेदन दिली. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ऑगस्ट मध्ये आयोजित केलेल्या जनता दरबारात हा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर जिल्हाधिकारी व बांधकाम उपविभाग यांनी पावसाळा संपताच कार्यवाही करू असे लेखी पत्राद्वारे कळविले. मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्याने श्री. गांवकर यांनी २६ डिसेंबरला बांधकाम ला स्मरणपत्र दिले. आता मात्र २८ पर्यंत कार्यवाही न झाल्यास २ मार्च पासून ग्रामस्थांना सोबत घेऊन माऊली मंदिर समोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.