You are currently viewing अमरावतीला कविवर्य श्री सुरेश भटांचे स्मारक झाले पाहिजे

अमरावतीला कविवर्य श्री सुरेश भटांचे स्मारक झाले पाहिजे

अमरावती :

खर म्हणजे अमरावती ही साहित्यिकाची इंद्रपुरी आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या गझलेने वेड लावणारे कविवर्य सुरेश भट हे अमरावतीचे सुपुत्र. एक विदर्भातला माणूस कवितेच्या बळावर काय करू शकतो याची मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कविवर्य सुरेश भट. त्यांचे बालपण त्यांचे शिक्षण अमरावती शहरातच झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही अमरावती शहरातच झाली. आम्ही सुरेश भट यांचेकडून अमरावती शहराचा चालता बोलता इतिहास अनेक वेळा ऐकला आहे. या सुरेश भटांच्या नावाने नागपूरला कविवर्य सुरेश भट नावाचे मोठे आधुनिक सभागृह रेशीमबाग परिसरामध्ये काही वर्षांपूर्वी तयार झाले आहे. नागपूरच्या या भव्य कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या उद्घाटनाला चक्क महामहीम राष्ट्रपती आले. एखाद्या कवीच्या नावाने असलेल्या सभागृहाच्या उद्घाटनाला राष्ट्रपती यावे हा खरं म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. योगायोगाने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मला योग आला. इतका भव्य कार्यक्रम एका कवीच्या नावाने व्हावा ही इतिहासात लिहिण्यासारखी गोष्ट आहे.

सुरेश भटांचा काही काळ नागपुरात गेला. पण त्यांनी तो गाजवून टाकला. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारांनी नागपूरला कविवर्य सुरेश भट सभागृह उभे राहिले. खरं म्हणजे सुरेश भटांचे जन्मगाव कर्मभूमी अमरावती या ठिकाणी त्यांचे स्मारक अपेक्षित होते. पण आमची अमरावतीची राजकारणी मंडळी साहित्यिक मंडळी हे स्मारक उभारण्याच्या कामात कमी पडली. नागपूर महानगरपालिकेने जसा पुढाकार घेतला तसा पुढाकार अमरावती महानगरपालिकेला घेता आला असता पण तो घेतला गेला नाही. अमरावतीला मोर्शी रोडवर जे श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन निर्माण झाले त्या भवनालाही कविवर्य सुरेश भटांचे नाव देता आले असते. पण ती गोष्ट तत्कालीन राजकारणात असलेल्या लोकांना लक्षात आली नाही आणि आता एक वेळा नाव गेल्यानंतर नामांतर करणे चुकीचे पण आहे. गैरसोयीचे पण आहे आणि वादग्रस्त पण आहे. आमचे क्रियाशील व संवेदनशील कवी मित्र श्री विष्णू सोळंके हे गेल्या कित्येक वर्षापासून मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. मंत्र्यांना भेटत आहेत. खासदार आमदारांना भेटत आहेत. निवेदन देत आहेत. त्यांच्या प्रामाणिक हेतू हा की कवीवर्य सुरेश भटांबरोबरच त्यांच्या समकालीन अमरावती शहरातील गाजलेले जे साहित्यिक आहेत त्यांच्या गौरवार्थ एक स्मारक अमरावती शहरात तयार झाले पाहिजे. सुरेश भटाबरोबर आपल्याला उद्धव ज.शेळके प्राध्यापक मधुकर केचे आणि शरदचंद्र सिन्हा डॉ. भाऊ मांडवकर. बाबा मोहोळ. सुदाम सावरकर यांची नावं घेता येतील. यांचे काम सुरेश भट इतके मोठे नसले तरी हे तत्कालीन लोकप्रिय लेखक आणि कवी आहेत. हे स्मारक होण्यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे ती राजकीय पाठबळाची तसेच साहित्यिकांनी एकत्र येण्याची. साहित्यिक मित्र आमचे साहित्यिक मित्र कवी संमेलन कथाकथन साहित्य संमेलन पुस्तक प्रकाशन या निमित्त एकत्र येतात आणि विसर्जित होतात. मी जेव्हा साहित्य चळवळीत होतो तेव्हा साहित्य संगम ह्या माझ्या संस्थेने पूर्ण विदर्भ ढवळून काढला होता. नंतर स्थापन झालेल्या बहुजन साहित्य परिषदेने तर अनेक प्रस्थापितांची झोप उडवली होती .पण मी २००० यावर्षी मिशन आयएएस सुरू केले आणि माझ्या आय ए एस या ध्येयामुळे साहित्य चळवळीकडे मागे दुर्लक्ष झाले आणि या गेल्या २५ वर्षात मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला असे दिसते की विष्णू सोळंके सारखे बोटावर मोजण्या इतके साहित्यिक साहित्य चळवळीमध्ये प्राण फुंकत आहेत. पण हे काम एकट्याचे नाही. आज साध्या साध्या माणसाची स्मारके होत आहेत. समाजभवनाच्या नावाखाली सांस्कृतिक सभागृहाच्या नावाखाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार पैशांची निधीची उधळण करीत आहेत. मग आमच्या अमरावतीच्या साहित्यिकांच्या वाट्यालाच का उपेक्षा यावी ? खरं म्हणजे कोणताही देश ओळखला जातो तो साहित्यिकांमुळे. राजकारणी लोकांमुळे नाही. राजकारणी आज आहेत. उद्या असणार नाहीत. पण आपला भारत ओळखला जातो तो रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीमुळे. अमेरिका ओळखली जाते की शेक्सपियरमुळे आणि रशिया ओळखला जातो तो मेक्सिम गार्कीमुळे. अनेक देशांनी आपापल्या देशातील राज्यातील कर्तृत्ववान साहित्यिकांचा वेळोवेळी गौरव केलेला आहे. त्यांची स्मारके तयार केलेली आहे. याला आपले अमरावती अपवाद आहे. नवीन पिढीला तर सुरेश भट हे अमरावतीचे आहेत हे देखील माहित असेल की नाही सांगता येत नाही. दादासाहेब खापर्डे अण्णासाहेब खापर्डे कविवर्य अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे के.ज. उर्फ शांताराम पुरोहित मराठी साहित्यशास्त्राचे लेखक डॉ.मा.गो.देशमुख सुप्रसिद्ध साहित्य व नाटककार डॉ. मधुकर आष्टीकर अरुण साधू हे या शहराचे वैभव. नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने हे अमरावतीला होते. यातील काही मंडळी तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि सुरेश भटांच्या नावाला तर संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर उचलून धरले आहे आणि म्हणून या निमित्ताने आमचे कवी मित्र श्री विष्णू सोळंके यांनी जो पुढाकार घेतला आहे तो निश्चितच उचलून धरण्यासारखा आहे आणि म्हणून साथी हात बढाना एक अकेला थक जायेगा मिलकर भोझ उठाना या नात्याने आपण श्री विष्णू सोळंके यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. रोटरी क्लबवाले एकत्र येतात. दर महिन्याला दर आठवड्याला त्यांचे गेट-टुगेदर होतात. त्याप्रमाणे अमरावतीची ही साहित्यिक मंडळी आहे. या मंडळींनी एकत्र येऊन विचारमंथन करण्याची गरज आहे. कविवर्य सुरेश भटांच्या स्मारकाचे काम एवढे सोपे नाही. त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री खासदार आमदार यांना वेळोवेळी भेटावे लागतात. त्यांना निवेदन द्यावे लागेल. स्मरण द्यावे लागेल. आणि असे झाले तर मग या कामाला गती येईल. मुख्यमंत्र्यांमागे तसेच लोकप्रतिनिधी मागे भरपूर कामे असतात. त्यांना साहित्यिक कामाचा विसर पडणे साहजिक आहे. पण त्यांना आठवण देणे हे आपले काम आहे. ते आपल्याला करावयाचे आहे आणि म्हणूनच आपण अमरावती शहरातील अमरावती जिल्ह्यातील लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपण त्यासाठी एकत्र येऊया. एक चळवळ उभारूया आणि एवढे मात्र खरे हे स्मारक होणार हे नक्की. कारण की सरकार कोणतेही असो सत्ताधारकांच्या मनामध्ये कविवर्य सुरेश भट यांचे स्थान आहे. ते या प्रस्तावाला नाही म्हणणार नाही. गरज आहे ती या कामी पुढाकार घेण्याची. आमचे पत्रकार बांधव देखील आमचे सामाजिक मित्र देखील या कामी आम्हाला मदत करीतच आहेत आणि ते भविष्यात देखील करतील अशी खात्री आम्हाला आहे. चला तर मग आज पासून सुरेश भट स्मारक समिती स्थापन करून या कामाला वेग देऊ या.

 

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती महाराष्ट्र 9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा