“सेवाव्रती आदरणीय आप्पांच्या जनशताब्दी सोहळ्यात सहभागी होण्याचा दुर्मिळ क्षण”.. ॲड. नकुल पार्सेकर
आयुष्यात काही क्षण असे असतात की ते अलौकिक आनंद देतात. आज ज्या आप्पांच्या कार्यकर्तुत्वाने देवगड ही देवभूमी बनली त्या देवभूमीत या देशाचे कार्य सम्राट केंद्रीय मंत्री आणि माझे सगळ्यात आवडते व्हीजनरी नेते आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीत आप्पांच्या जनशताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
माझे सौभाग्य असे की व्यासपीठावर सन्मानपूर्वक बसून हा सोहळा अनुभवता आला. एवढेच नव्हे तर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आप्पा प्रेमींच्या समोर पाच मिनिटे व्यक्त होण्याची संधी मिळाली. अर्थात यासाठी माजी आमदार अजीत गोगटे, आप्पांचे चिरंजीव प्रकाश उर्फ बंड्या गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार आणि आप्पासाहेब गोगटे जनशताब्दी सोहळा समितीच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार.
आदरणीय गडकरी यांचे विचारमंथन मी आवर्जून यूट्यूब किंवा प्रसारमाध्यमांतून ऐकतो, वाचतो. खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माणाच्या कामात झपाटून काम करणाऱ्या गडकरींचे दुर्मिळ आणि भावणारे संबोधन अगदी जवळून व्यासपीठावर बसून ऐकण्याची संधी मिळाली हा माझ्यासाठी दुर्मिळ क्षण.
या प्रसंगी जी समृतीगंध स्मरणिका प्रकाशित झाली त्या स्मरणिकेच्या मुखपृष्ठावर अटल प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनानिमित्त माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू यांच्या हस्ते आप्पांचा केलेल्या सत्काराच्या फोटो पाहून आनंद द्विगुणीत झाला.
या प्रसंगी बंड्या गोगटे यांनी आप्पांचा जीवनपट उलगडणारे लिहिलेले “जनता जनार्दन” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात विविध छायाचित्रे आहेत.. यामध्ये असे एक छायाचित्र आढळले आणि जुन्या स्मृतीना उजाळा मिळाला. आदरणीय आप्पांच्या एकसष्टी निमित्ताने सावंतवाडीत आप्पांचा गौरव करणारा कार्यक्रम झाला होता. तेव्हा माजी आमदार व भाजपाचे तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पण एक कार्यकर्ता म्हणून सक्रिय होतो. हा सत्कार भाजपाचे जेष्ठ व श्रेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींच्या शुभहस्ते झाला होता. तेव्हा ओवाळणी करून लालजींचे स्वागत करणाऱ्या ज्या पाच महिला होत्या त्यात माझ्या सौभाग्यवती पण होत्या. तो फोटो या पुस्तकात पाहून जुन्या आठवणीना उजाळा मिळाला.
याप्रसंगी आणखीन एक सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे भाजपाचे जुने जाणते व निष्ठावंत नेते काका ओगले व सौ. ओगले या दांपत्याचा झालेला ह्यद्य सत्कार. ज्या काका ओगलेंचा उल्लेख आपल्या भाषणात अनेकदा आदरणीय गडकरीजीनी केला.
आमचे कौटुंबिक स्नेही आणि काॅनबॅकचे संचालक श्री मोहन होडावडेकर यांनी कल्पकतेने बांबूपासून बनवलेले स्मृतिचिन्ह गडकरी साहेबांना आयोजन समितीच्या वतीने देण्यात आले. त्यानाही व्यासपीठावर सन्मानाने बसवून गौरविण्यात आले.
खूप दिवसानंतर देवगडात गेलो. आदरणीय सुलभा देशपांडे, श्री सुधीर जोशी, काका ओगले व कुटुंबिय, अजित गोगटे आणि कुटुंबिय या सगळ्या जुन्या मंडळी़ची भेट हा क्षण सुखदायक होता.
आप्पांच्या जनशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने ही सर्व मंडळी भेटली..