रेडी गावातील शेतकरी, ग्रामस्थ व संस्थेचे पदाधिकारी बसणार उपोषणाला
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावात मे. गोगटे मिनरल्स व निमको या मायनिंग कंपन्यांकडून स्थानिक शेतकरी व जमीनदारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत त्यांना नैसर्गिक न्यायहक्क मिळावा याकरिता दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने शेतकरी, ग्रामस्थ व संस्थेचे पदाधिकारी हे सनदशीर मार्गाने बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची माहिती संस्थेचे सह सचिव विश्वनाथ शेलटे (सिद्धेश) व स्थानिक शेतकरी व सदस्य मनोहर बुज्जी यांनी दिली.
रेडीतील शेतकरी, ग्रामस्थ व संस्थेचे पदाधिकारी उपोषणकर्त्यांनी केलेल्या प्रमुख मागणीप्रमाणे, रेडी खाडीत बेकायदेशीरपणे अवैधरित्या वाळूमाफियांकडून सुरु असलेला वाळू उपसा त्वरित थांबवून त्यांचेवर कारवाई करणे, रेडीतील म्हारतळे, कन्याळ व हुडा ह्या महसूल गावातील जमीनदारांच्या लीज मुक्त जमिनीवरील ७/१२ वरील बोजा शासनाने त्वरित कमी करणे, खाणं कंपन्यांकडून नैसर्गिक स्रोतातून खाणीत उपलब्ध असलेला गोड्या पाण्याचा बेसुमार उपसा त्वरित थांबवणे, खाण कंपन्यांकडून सोडण्यात आलेल्या खनिजयुक्त गाळामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणात खाजगी शेतजमिनीचे झालेले नुकसान व खाण कंपनीने पाणी न सोडल्याने माड बागायत मर होऊन झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्वरित प्रभावाने मिळावी या प्रमुख मागण्यांकरिता संस्थेच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.