You are currently viewing मिठी हरिची

मिठी हरिची

*महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेचे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित कवितेचे लेखक विनय पारखी यांनी केलेले रसग्रहण*

 

*मिठी हरिची*

 

येते मनीच माझिया

तव मिठीतची यावे

मिटूनीच पापण्यांना

मनप्रीतीला अर्पावे

दैवाचे दान अनोखे

ओंजळीतुनी झेलावे

भावप्रिती मनःशांती

मिराराधेलाच स्मरावे

मनगोकुळी नांदताना

हरि मिठीत विर्घळावे

 

*मिठी हरिची’ ही भावकवी विगसा यांची* वरवर साधी आणि सोपी वाटणारी रचना. परंतु संतसाहित्याचा गाढा अभ्यास असणारे विगसा एवढी साधी रचना काय कशी करतील हा ज्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो त्यावेळी त्या कवितेतील गूढ उकलण्याचा आपण आपल्यापरीने प्रयत्न करू लागतो.

 

‘मिठी हरिची’ ही रचना वाचल्यावर त्या कवितेचा भावार्थ खालील प्रमाणे असावा असे आपल्या लक्षात येते :-

 

ज्यावेळी आपल्या मनात येईल त्यावेळी आपण हरिच्या मिठीत जावे आणि डोळ्यांच्या पापण्या मिटून आपल्या मनीचा प्रेमभाव त्या ईश्वरास अर्पण करावा. असे करत असताना राधा आणि संत मीराबाई यांचे मनोभावे स्मरण करावं. कारण त्या भगवंताची प्रेमभावे भक्ती करण्यासाठीच हा नरदेह आपल्याला मिळाला आहे. त्याच सार्थक आपल्याला जर करायचे असेल तर आपल्या मनात त्या भगवंताविषयी प्रेमभाव उत्पन्न झाला पाहिजे. जसा प्रेमभाव राधा आणि मिरा यांच्या मनात उत्पन्न झाला होता अगदी तसाच प्रेमभाव आपल्या मनात उत्पन्न झाला पाहिजे आणि यासाठीच ईश्वराने आपल्याला ह्या नरदेहाचे अनोखे दान दिले आहे असे कवीला वाटते.

 

पण जस जसे आपण त्या कवितेतील गूढ उकलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी खालील गोष्टी आपल्या निदर्शनास येऊ लागतात :-

 

वास्तविक पाहता मिठी या शब्दांतच मिठास आहे. हल्ली मिठी मारणं हे सामान्य समजलं जातं. परंतु आपण स्वतःच स्वतःला मिठीत घेऊ शकत नाही हे सत्य आहे. मिठी मारण्यासाठी दुसरं कोणीतरी आपलं असं असावं लागतं. कारण देवाने आपल्याला जन्माला घालताना बुद्धी आणि मन हे दोन्ही दिले आहे. पण कवीला अपेक्षित असलेली मिठी कशी आहे तर ती प्रत्यक्ष भगवंताने आपल्याला मारलेली मिठी आहे. ती मिठी हरिच्या प्रेमाची आहे. त्या मिठीसाठी प्रत्यक्ष हरि भुकेला आहे. पण वास्तवात हे असं कसं शक्य होऊ शकतं ? या विषयाकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. हे असं घडू शकतं ते केवळ सद्गुरुंच्या कृपाशीर्वादाने आणि अनन्य भावाने त्या ईश्वराला शरण गेल्यावर. हेच या कवितेतील गूढ रहस्य आहे.

 

या साठी संत ज्ञानेश्वरांनी एक छान दृष्टांत दिला आहे. ते म्हणतात…

 

समुद्राच्या पाण्याची खोली किती आहे हे जाणून घेण्यासाठी जर मिठाच्या बाहुलीने त्यात बुडी मारली तर ती समुद्राच्या पाण्यात विरघळून जाईल. ती मीठ रुपी बाहुली पाणीरूप होईल. समुद्राच्या पाण्यापासून तिची चवही आपल्याला वेगळी करता येणार नाही. मग ती मिठाची बाहुली समुद्राच्या पाण्याची खोली कशी काय मोजणार ? यासाठी माउली सांगतात… ज्यावेळी आपण हरिच्या मिठीत जाण्यासाठी आतुर असतो त्यावेळी ती मिठी म्हणजेच आपण आपल्या अंतरंगात असणाऱ्या त्या आत्मस्वरूपात विलीन होणं. माझ्यातला ‘मी’ ज्यावेळी उरत नाही त्याचवेळी हे शक्य होऊ शकतं. खरं पाहता देव जे काही आपल्याला देतो तेच आपण त्याला अर्पण करतो. पण त्या परमपित्या परमात्म्याचे जर आपल्यावर प्रेम बसायला हवं असेल तर आपण आपला अहंकार आणि अभिमान त्याला अर्पण करायला हवा.

 

गीतेच्या १८ व्या अध्यायात भगवंत अर्जुनाला उद्देशून म्हणतात… “तुझे मन सतत माझ्याकडे केंद्रित असू देत, तुझी सर्व कर्मे तू मला समर्पित कर, माझ्यावर विश्वास ठेवून तू मला अनन्य भावाने पूर्णपणे शरण ये, असं केल्यास तू मला प्राप्त होशील” याचाच अर्थ असा की ज्यावेळी नदीचे पाणी समुद्राला मिळते त्यावेळी ते नदीचे पाणी रहात नसून ती नदीच समुद्रात विलीन होते. यालाच म्हणतात ‘समर्पण’ आणि ही समर्पणाची भावना एकदा का अंगी निर्माण झाली की मग हरि आपल्याला मिठीत घेतल्या शिवाय राहात नाही हे स्वतः भगवंतांनी दिलेले वचन आहे.

 

जर आपण कृष्ण जन्मापासून त्याचा अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येते की भगवंत आपल्या आप्तांपेक्षा आपल्या भक्तांवर अधिक प्रेम करतात. हे गूढ सत्य जे भगवत्गीतेत नाही ते माउलींनी आपल्यासाठी सांगितले आहे. खरं पाहता जन्मदेणारे आई-वडील, माता देवकी, बंधू बलराम, हरिची प्रिय पत्नी लक्ष्मी हे सर्व देवांचे जवळचे नातेवाईक पण देवांचं सख्य जमलं ते भक्त अर्जुनाशी. कारण जे आपण आपल्या घरच्यांशी व्यक्त होऊ शकत नाही ते आपण व्यक्त होतो फक्त आपल्या जिवलग मित्रांसमोर हेच खरं सत्य आहे.

 

जसं आपल्याला आपली कोणी स्तुती केलेली आवडते तशीच देवाला भक्ताने केलेली त्याची स्तुती आवडते. त्याची स्तुती म्हणजे त्याचे प्रेमभावे घेतलेले नाम. हे प्रेमभावे आपण नाम कधी घेतो ज्यावेळी आपली स्थिती विरहाची असते. कारण विरहात ओढ अधिक जाणवते. आणि हाच विरह हीच विरहअवस्था भक्तीतील भगवंताच्या मीलनाची अवस्था आहे असे माउली सांगतात. ते म्हणतात विरह जर एवढा मधुर असेल तर विरहानंतर होणारे पुनर्मीलन किती मधुर असेल ? भगवंताच्या ब्रह्मसुखाचा भोग घेताना आपण आपले राहात नाही. सर्व द्वैत नष्ट होऊन अद्वैत उरते. अहंकाराचा पडदा गळून पडतो, अभिमान नाहीसा होतो. मगाशी आपण जे नदीचे उदाहरण बघितले आता ती नदी नसून पाणीच पाण्यात विलीन होते. म्हणजेच आपण आपल्या स्वतःला मिठी मारतो. अशी असते हरिची मिठी.

 

विगसा सरांनी हरिच्या मिठीसाठी राधामिरा आणि समस्त गोकुळवासी यांच्या उदाहरणाचा दाखला आपल्या रचनेत दिलेला आहे. कारण राधा आणि मीरा म्हणजे मूर्तिमंत प्रेम, भक्ती व समर्पणाचे प्रतिक आहेत. असा प्रेमभाव भगवंताच्या चरणी अर्पण करायचा की भगवंताला आपला मोह झाला पाहिजे. त्याचा अनुराग आपल्यावर जडला पाहिजे. तरच हरिची मिठी प्राप्त करता येऊ शकते.

 

यासाठी संत तुकाराम महाराज सरळ साध्या शब्दात आपली अनुभूती व्यक्त करतात …

 

“देव पहावयास गेलो I तेथे देवची होवून गेलो II

हृदय हृदय एक झाले I ये हृदयीचे ते हृदयी घातले II

 

ज्याप्रमाणे बासरी पोकळ असते पण त्यात हवा फुंकल्यास त्यातून मधुर सप्तसूर निर्माण होतात त्याप्रमाणे आपल्याला आधी रिकामे व्हावे लागते. आपला अहंकार, आपल्या इच्छा, आपल्या वासना यांचा बळी द्यावा लागतो त्यानंतरच भगवंत आपल्याशी सख्य जोडतो. संत रामदास स्वामींनी या भक्तीचे नवविध प्रकार सांगितले आहेत. ज्याला जशी जमेल तशी त्याने भक्ती करावी. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कंस. सतत कृष्णाच्या हातून आपला मृत्यू होणार आहे या भयाने का होईना तो सतत कृष्णाचा दुःस्वास करत राहिला पण त्याच्या मुखात भगवंताचे नाम येत राहिले म्हणून कृष्णाने त्याला लवकर मुक्ती दिली. म्हणजे नाम कसे घ्यावे हे ज्याचे त्याचे ठरवायचे असते. त्यासाठी सद्गुरूचा कृपाशिर्वाद असायला लागतो. अन्यथा मोक्ष आणि मुक्ती यात गल्लत निर्माण होऊ शकते. शेवटी राधामिराला स्मरत गोकुळवासीयांनी जसं हरिला मनोभावे भजलं त्याप्रमाणे हरिच्या मिठीत विर्घळुन जावं असं कवीला वाटतं.

 

*(c) विनय पारखी अंधेरी ( मुंबई )*

प्रतिक्रिया व्यक्त करा