*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वास्तव आणि स्वप्न !*
वास्तव आणि स्वप्नं ,
दोन शब्द विरोधी !
एक सत्य दाखवी,
तर दुसरे मनवेधी!…१
वास्तव असते निबर जून,
कासवाच्या पाठीसारखे!
स्वप्न असते रंगबिरंगी,
उडणाऱ्या फुलपाखरासारखे!…२
वास्तवाचे चटके,
असती फार दाहक !
स्वप्न फुलपाखरांचे रंग,
दिसती खूप मोहक !…३
वास्तव असते कटू ,
व्यवहाराच्या निकषांवर !
फुलपाखरू बघते उडू,
स्वप्नांच्या फुलोऱ्यावर !….४
जगताना जीवन हे,
वास्तवाचा ताण फार !
स्वप्न मनी जपताना,
भावनांचा आधार !….५
गुंफण करू नाजूकशी,
वास्तव आणि स्वप्नांची!
प्रार्थिते मी ईश्वरास,
उसवू नये वीण त्याची !…६
उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

