*चिपी विमानतळाच्या श्रेयासाठी भांडणारे विमानतळ बंद पडून तिन महिने होत आले तरी आता गप्प का.*
*विमानतळ सुरू करणे व पर्यटन उद्योग वाढवण्याच्या घोषणा फक्त निवडणूक काळापुरत्याच:-मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.*
तत्कालीन सत्ताधारी आणि सध्याचे सत्ताधारी एरवी चिपी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणी आणले आणि कोणी सुरू केले यासाठीच भांडत असतात. परंतु आता चिपी विमानतळ बंद पडून जवळपास तीन महिने पूर्ण झाले तरी यापैकी कोणालाच याबाबत पडलेलं नाही. सद्यस्थितीत पर्यटन हंगाम सुरू होण्यास अगदी काही दिवसच शिल्लक राहिले असताना या भागाचे आमदार माजी मंत्री दीपक केसरकर हे तर पुन्हा मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजीतून या भागाकडे त्यांनी तर साफच दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आणि माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी फोडून आपल्या पक्षात घेत पक्ष वाढवण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळे यांनाही चिपी विमानतळ बंद पडून तिन महिने झाले तरी जाग येत नाहीये.
याउलट सध्या चिपी विमानतळाचा उपयोग मंत्र्यांचे खाजगी अथवा शासकीय विमान उतरण्यासाठीच उपयोग होताना दिसत आहे. सद्यस्थितीत मंत्रालयात बसून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन, रोजगार व इतर विकासात्मक बाबींवर बैठका घेण्यासोबतच प्रत्यक्षात जिल्ह्यात फिरून निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.विमानतळ झाल्यावर याभागाचा कायापालट होऊन स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल या आशेने कवडीमोल भावाने ज्यांनी या प्रकल्पासाठी जमीनी दिल्या त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. येत्या पंधरा दिवसांत चिपी विमानतळ पूर्ववत सुरू न झाल्यास मनसे मार्फत जिल्हाधिकाऱ्यां करवी विमानतळाला लावण्यासाठी टाळे उपलब्ध करून देईल अशी माहिती उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.