You are currently viewing थोडसं मनातलं

थोडसं मनातलं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सीमा शास्त्री मोडक लिखित अप्रतिम लेख*

 

*थोडसं मनातलं*

 

*संभ्रम रेल्वेच्या घड्याळाचा*

 

“काय ग किती वाजले”

” अगं 13.35 झाले”

” काय ,काय म्हणालीस?”

असा संवाद आपण कधी ऐकला आहे का? नाही ना? अहो कारण आपण बारा ताशी घड्याळ आपल्या व्यवहारात वापरतो. बोलताना, लिहिताना, घरी, ऑफिसमध्ये, इतरत्र सर्वच ठिकाणी मला वाटतं आपण बारा तासांचं घड्याळ वापरतो. म्हणजे दुपारी 12 नंतर आपण पुन्हा 1,2,3 वाजले असंच म्हणतो. लिहिताना दुपारी किंवा p.m. असा उल्लेख करतो. आपल्या सर्वांना त्याची खूप सवय अगदी लहानपणापासूनच झाली आहे.

पण मग रेल्वे खाते हे बारा ताशी घड्याळ,जे सर्वांनाच सोयीचं आणि समजायला सोपं आहे ते का नाही अमलात आणत? अनेक जुन्या बाबी आपण बदलत आहोत. त्यात सुधारणा करत आहोत. शासन अनेक नव्या बाबी अमलात आणत आहे. मला वाटतं रेल्वेच्या 24 तास घड्याळ ऐवजी 12 ताशी घड्याळाचा ही शासनाने विचार करावा.

आता हा विचार का करावा? मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांचा तारीख आणि वेळ याबाबत गोंधळ झालेला असेल. कदाचित आपली ट्रेन ही चुकली असेल. आपले पैसेही वाया गेले असतील. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या दृष्टीने गुरुवारी रात्री 1. 35 ची ट्रेन म्हणजे रेल्वे खात्याची शुक्रवारची 1. 35 ची ट्रेन असते. कारण रात्री बारानंतर रेल्वेचा दुसरा दिवस सुरू होतो. तसा तर आपलाही सुरू होतो. पण आपण व्यवहारात बोलताना गुरुवारी रात्री असंच म्हणतो. पण रेल्वेच्या घड्याळ्याप्रमाणे ती रात्र म्हणजे शुक्रवार सुरू झालेला असतो. त्या तिकिटावर friday 1.35असे लिहिलेले असते. त्यामुळे गुरुवार की शुक्रवार हा गोंधळ होतो. रेल्वेच्या घड्याळात a.m. किंवा p.m.याचा ते वापरच करत नाही. कारण ते 24 ताशी हे घड्याळ असतं. तसेच दुपारी 12 नंतर 13 ,14,—– 23 पर्यंत वेळ देण्याऐवजी 1.25p.m.किंवा 2.45p.m. अशी दिल्यास प्रवाशांचा गोंधळ होणार नाही असे मला वाटते. तसंच तिकिटावर 1.00 किंवा 2.00 अशी वेळ दिली असली तर खूप वेळेला आपल्याला दुपारचा 1.00 किंवा दुपारचे 2.00 असे हे वाटतात कारण आपल्याला ती सवय झालेली असते. पण रेल्वेच्या भाषेत 1.00 आणि 2.00 म्हणजे रात्रीचे असतात हे आपल्या बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही. रेल्वेने सुद्धा 12 ताशी घड्याळ केल्यास सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होणार नाही असे मला वाटते.

बघा तुम्हाला पटतंय का?

 

सौ सीमा श्रीराम शास्त्री मोडक

मुख्याध्यापक; डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल,नंदुरबार

प्रतिक्रिया व्यक्त करा