मुंबई गोवा महामार्गावर गडनदी पुलावर ट्रकने दुचाकीला उडवले..
दहा वर्षाच्या मुलासह महिला गंभीर
कणकवली
मुंबई गोवा महामार्गावरील गडनदी पुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला फरफटत नेले. रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. यात दहा वर्षाच्या मुलासह त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. घटनेचे वृत्त समजताच कणकवलीकरांनी गडनदीपुलावर गर्दी केली असून मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला आहे.
ट्रक गोव्याच्या दिशेने जात होता. तर दुचाकीवरील आई आणि चौथीमध्ये शिकणारा मुलगा हे हळवल येथे जाणार होते. हळवल फाटा येथे ट्रकने दुचाकीला पंचवीस ते तीस फुट फरपटत नेले. त्यानंतर ट्रक थांबवून ट्रक चालक पसार झाला. या दरम्यान ज्येष्ठ पत्रकार आबा खवणेकर आणि त्यांचे सहकारी कुडाळच्या दिशेने जात होते. त्यांना ही बाब समजताच त्यांनी तातडीने अपघामधील जखमी आई आणि तिच्या मुलाला आपल्या कारमधून शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र दोहोंची प्रकृती गंभीर आहे.
महामार्गावरील गडनदीपुलालगतच्या हळवल फाटा येथे सातत्याने अपघात होत आहेत. मात्र महामार्ग विभाग त्यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ कणकवलीकरांनी एकत्र येऊन रास्ता रोको सुरू केला आहे. यात महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.