सावंतवाडी :
१९ फेब्रुवारी रोजी मळगाव रस्तावाडी येथील ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त शिव इतिहासातील एक सुवर्ण योग म्हणजे “मराठा आरमाराची निर्मिती” ह्याच निर्मिती मागचा इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी राणे यांच्या संकल्पनेतून आणि शिवकालीन ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहातुन खास निवडक शिव ऐतिहासिक वस्तूंची प्रतिकृती प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.
शिवजयंतीचे यंदाचे हे ६ वे वर्ष आहे. या प्रदर्शनात मराठा आरमारातील तीन मुख्य लढावू जहाज प्रतिकृती, छत्रपती श्री. शिवाजी महाराज निर्मित सुवर्ण होन व शिवराई प्रतिकृती, मराठ्यांच्या शस्त्रागारातून मुख्य शस्त्र जी खुद्द छत्रपती च्या देखील हातात असायची ती म्हणजे मराठा धोप, मावळ्यांच्या लढावू बाण्याला शोभणारी मराठा वर्क धोप, शिवप्रतापच्या वेळेस अफजलखानाचा वध करताना वापरण्यात आलेली दोन मुख्य शस्त्र वाघनखे व कट्यार, मराठा आरमार ग्रंथातून २२ फोटोचे प्रदर्शन, मराठा आरमारातील जहाजांवर असणारी तोफ प्रतिकृती, पावनखिंडीत बलिदान देणाऱ्या नरवीर बाजीप्रभु देशपांडे ह्यांची ऐतिहासिक वंशावळ, शिव ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ व अस्सल महाराजांचा पेहराव दाखवणारे ऐतिहासिक फोटो प्रदर्शनआदी शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. मळगाव व पंचक्रोशीतील शिवभक्तांना व शिवप्रेमींना एक वेगळीच पर्वणी पाहायला मिळणार असल्याने एक दिवस शिव अभ्यास म्हणून भेट देत शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानेश्वर राणे यांनी केले आहे.

