You are currently viewing आहेस तू

आहेस तू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*आहेस तू*

 

खरं म्हणजे तुझी जाणीव जन्मापासूनच झाली. आईच्या गर्भात वाढतानाही तू होतास आणि मातेच्या उदरातून एका जादूमयी, अवाढव्य, वेगळ्याच विश्वात डोळे झाकून पहिला श्वास घेतानाही तू होतास. कंठातून उमटलेल्या रुदनातल्या स्वरातही तूच तर होतास आणि आईच्या स्तन्यातून मी तुलाच पहिला स्पर्श केला. तिने गायलेल्या अंगाई गीतातून तुझाच आश्वासक आवाज ऐकला.

 

हळूहळू तू निरनिराळ्या रुपात दिसायला लागलास. मनावर एक संस्कार सहजपणे होत गेला की तू सर्वत्र आहेस. चराचरात तुझं वास्तव्य आहे. तू हवेच्या झुळूकेत आहेस. तू फुलांच्या सुगंधात आहेस. नदीच्या, मेघाच्या सागराच्या जलात आहेस, प्रकाशात आहेस आणि अंधारातही आहेस. दिसत नसलास तरी तू आहेस ही ठाम भावना कुठेतरी हृदयात रुजलेली होती म्हणून मी निर्भय होते. तू माझ्या मागे होतास, पुढे होतास, पायातल्या आणि पायापासून लांब असलेल्या सावलीतही होतास.

 

तूच तर मला जन्माला घातलंस. मोठं व्हायला शिकवत असताना मात्र जाणवायचं की कधीकधी तुझा हात माझ्या हातातून तू अलगद काढून घेतला आहेस. शहाणपण अंगात इतकं मुरत होतं की तू दुरावत चालला आहेस, तुझा विसर पडत चालला आहे हे समजतच नव्हतं. मी माझ्याच धुंदीत, नशेत होते. तेव्हा मात्र आधी मी होते तू नंतर होतास.

 

एक दिवस आजी म्हणाली, “ चांगलं बोल गं जरा! चांगले विचार मनात आण. तो पाहतो बरं? तो ऐकतोही. नकळत तथास्तुही म्हणतो.”

 

वेडपट वाटायचं मला तिचं बोलणं.

कोण तो?

आपल्याला दिसत नाही तो ऐकेल कसा? पाहील कसा?

 

पण निर्गुणातून तू जेव्हा सगुणात आलास ना तेव्हा मात्र मला खूपच मजा वाटू लागली होती. जटाधारी, मुरलीधर, शेषशाही, लंबोदर, गजमुखी, अठ्ठावीस युगे उभा विटेवरी, वामांगी रखुमाई. अशा विविध रूपात तू मलाही दिसू लागलास. माझ्यासाठी हे सारं अबोध होतं. नक्की कोण होतास तू? आकलनाच्या पलीकडे होतं सारं पण थतरीही एक सूक्ष्मपणे जाणवत होतं की या मूर्त स्वरूपात मी तुला पाहू शकत होते. कल्पनेत का होईना मी तुझ्याशी संवाद साधू शकत होते, तुझ्याशी भांडू शकत होते, तुला जाब विचारू शकत होते, तुझ्यापाशी फिर्याद करू शकत होते, हवं असलेलं, इच्छित मागूही शकत होते. कित्येक वेळा तर मी इतरांचं अनुकरण करून तुझ्या आरत्या गायल्या, स्तोत्रं म्हटली, तुझ्या नावाचा गजर मांडला, अगदी तुझ्या नावाने उपासतापासही केले बरं का! तुझ्या आवडीची फुलं वाहिली, तुझ्या आवडीच्या रंगांची वस्त्रे ल्यायली, तुझ्या आवडीचे भोग ही चढवले, गावे पालथी घातली, तीर्थाटने केली, गंगा- गोदावरीत डुबक्याही मारल्या पण तरीही एक प्रश्न सदैव मनाला बोचत होता.

मी हे का करते?

मी यात नक्की कुठे आहे?

मी भक्त की अभक्त?

मी श्रद्धायुक्त की अश्रद्ध?

मी आस्तिक की नास्तिक?

मी अर्थपूर्ण की अर्थहीन?

भवसागरात माझी जीवननौका मध्यधारेत डळमळत होती म्हणून मी अशी तुझ्यापाठी आशेने धावत होते का? मी माझा विश्वास गमावला होता, भयभीत होते, अशांत होते, तुला शोधत होते पण तू मात्र सापडतच नव्हतास. अधिक दुरावला होतास नव्हे नाहीसाच झाल्यासारखा वाटत होतास. प्रचंड गर्दीत, लोटालोटीत, चेंगराचेंगरीत गोंगाटात, कल्लोळात तू कुठेच नव्हतास कोणासाठीच…

 

तेव्हा खोल गर्भातून आवाज यावा तसे काहीतरी जाणवले.

“ तू फक्त कर्म कर. कर्मावर तुझा अधिकार आहे फळावर नाही. एक विसरू नकोस, कर्म करणारा तू कुणीही नाहीस.. तू फक्त निमित्तमात्र आहेस. कर्ता करविता मी आहे. सारं काही मलाच समर्पित कर आणि मुक्त हो.”

का कोण जाणे त्या क्षणी मला पुन्हा आईच्या गर्भात ऐकलेला तोच हुंकार जाणवला. नेणिवेपलिकडचा तो एक ब्रम्हनाद मी पुन्हा अनुभवला.

 

अशा त्या गोंधळलेल्या अवस्थेत जेव्हा मी समोर मांडलेल्या फाफटपसार्‍याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा माथ्यावरचे अथांग आभाळ मला जाणवले. त्या आभाळमायेने मला जेव्हा कवेत घेतले तेव्हा मी पूर्णपणे विसावले. एका पर्णहीन वृक्षावर पुन्हा कोवळी पालवी फुटत होती. शिशिर संपत होता आणि वसंत फुलत होता.

 

गाभाऱ्यात, गाभाऱ्याबाहेर प्रचंड जनसमुदाय जमला होता. तू पुढे की मी पुढे? तुला की मला? “चला चला थांबू नका” गर्दी, धक्काबुक्की, ढकलाढकली, मनोभावे उरापोटी जपलेलं ते पूजेचं ताट, कुस्करत जाणारी फुलं, पत्री, देहाची आणि मनाचीही कुतरओढ.

 

अशावेळी मी मात्र काठावरून, दूरस्थपणे इंद्रायणी नदीचं ते भव्य पात्र आणि संथ वाहणारं पाणी पाहत होते नेत्राचं पारणं फिटत होतं, डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेजोगुणांचा स्पर्श मला जाणवत होता. तो दुसरा तिसरा कुणीही नव्हता. तूच होतास फक्त तूच. माझ्याच हृदयात वसलेला. दूर नव्हतास, जवळच होतास. म्हणत होतास *भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.*

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा