*आधार प्रमाणीकरण न केल्यास अनुदान मिळणार नाही’
संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका ;
राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांच्या अनुदानाची देयके फक्त त्या लाभार्थ्यांना दिली जातील ज्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे.
या निर्णयामुळे आधार प्रमाणीकरण न केलेल्या १० लाख लाभार्थ्यांना अनुदान मिळणार नाही
गेल्या वर्षभरात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेसाठी लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याची मुदत देण्यात आली होती. निवडणुकीच्या काळात या प्रमाणीकरणाच्या अटी न घालता सर्व लाभार्थ्यांना फायदा दिला गेला होता. मात्र, आता सरकारने या दोन्ही योजनांसाठीच्या निकषांचे कठोरपणे पालन करण्याचे ठरवले आहे.
राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, सर्व जिल्हा व तालुका कार्यालयांना विशेष साहाय्य योजनांसाठीचा निधी बिम्स प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिला जाणार नाही.
जिल्हाधिकाऱ्यांना डीबीटी पोर्टलवर प्रलंबित लाभार्थ्यांची माहिती भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, आधार प्रमाणीकरण न झालेल्या लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य न मिळाल्यास त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असेल.
लाभार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून एकाच बँकेशी जोडले जावे. त्यामुळे त्यांना योजनांचा लाभ वेळेवर मिळू शकतो.