You are currently viewing तू आहेसच आमच्या हृदयात…

तू आहेसच आमच्या हृदयात…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*तू आहेसच आमच्या हृदयात…*

 

म्हणजे काय? तू नाहीस? हे कसं शक्य आहे?

मग झाडाची पाने हलतील कशी? वारा वाहील

कसा? पाऊस पडेल कसा? एकेका दाण्याचे

हजार होतील कसे?

 

महत्वाचे म्हणजे आईच्या पोटात गर्भाचे हृदय

बनल्यावर त्यात प्राण फुंकून ते चालेल कसे?

ते नुसतेच निर्जीव राहून उपयोग काय? ते

अव्याहत धडकणारे, शरीर चालवणारे मशिन

आहे ना? ते प्राण फुंकल्याशिवाय सुरू होतच

नाही मुळी.. आणि ते काम फक्त तूच करू शकतोस बाबा.. फक्त तूच..

तो अधिकार तू अजून तरी कुणाला दिलेला नाही. आणि देऊ ही नकोस बाबा. अरे, तुझ्या

इतके नीटनेटके काम कुणीतरी करणे शक्य

आहे का? अरे, नुसती आमची शरीर रचना पाहिली तरी थक्क व्हायला होते रे! राम.. राम !

केवढे ते किचकट काम आहे बाबा! नुसत्या आतड्यांची रचना पाहिली तरी डोळे पांढरे होतात. आणि ते हृदय आणि त्याचे न चुकता

पडणारे ठोके.बाप रे, त्याची तर आम्ही कल्पनाही करू शकत नाही.

 

आणि विश्वातले हे अब्जावधी जीव. मुंगी पासून

हत्तीपर्यंत तुझीच तर रचना आहे ना? इतके जीव

जन्माला घालणे, त्यांचे पालन पोषण करणे, साधे का काम आहे? नुसती त्या कोळ्याची रचना, त्याचे ते मापात विणलेले जाळे पाहून आम्ही चक्रावून जातो. आणि ती सुगरण व तिचे

ते घरटे. तूच दिली ना साऱ्यांना ही बुद्धी? एक ना

अनेक. झाडे, वेली, पाने, फुले,ऋतू थोडे का काम

आहे तुला. तुझा पसाराच प्रचंड आहे. मी फक्त काही उदा. दिली रे.

 

चोच देणारा तूच नि चारा देणाराही तूच. तुझ्या

शरीरातून उगम पावून आम्ही तुझ्यातच विलीन

होतो. तू ज्या क्षणी आमच्या हृदयातून निघून जातो त्या क्षणी आमचा श्वास थांबून ह्या सुंदर

शरीराचे कलेवर बनते. मग तूच सांग, तू आमच्या

हृदयात नाहीस कसा? बाबा रे, या विश्वातला

प्रत्येक श्वास तुझ्यामुळे चालू आहे. ज्या क्षणी

तू तुझा हात काढून घेतो त्या क्षणी सारे थंड पडते. अनंत कोटी हृदयात तूच आहे, म्हणूनच ते

श्वास चालू आहेत. तुझी ही विश्व चालवण्याची किमया आमच्या तरी डोक्यावरून जाते बाबा.

कसे सांभाळतोस तू एकटा हे सारे? खूप प्रश्न पडतात रे आम्हाला. पण स्वत: मेल्याशिवाय स्वर्गही दिसत नाही ना? मग आम्ही फक्त तुझी

कल्पना करतो नि मुळचा निर्गुण असलेला तू पण आम्ही त्याचे सगुण रूप बनवले. आमच्या

मनानेच तुला आकार दिला. ज्याला जसा पाहिजे तसा नि तुला आम्ही भजू लागलो.

 

आम्ही इतके वेडे की, तू हृदयात असून तुला पार्थिवात शोधू लागलो. तू प्रत्येकच सजीवात

आहे हे आम्ही ठार विसरलो.मंदिरात, राऊळात,

तीर्थक्षेत्री तुला शोधायला आम्ही भटकू लागलो.

कित्ती वेडे रे वेडे आम्ही. तू सांगतो काय, आम्ही

करतो काय? सारे अजबच आहे. तू इतके सोपे

सांगतो की, मला भजा. बाकी मला काही नको.

अरे, तूच निर्माण केलेली फुले, फळे आम्ही तुला अर्पण करतो नि वरून तुझ्याकडून काहीतरी मागतो ही! कित्ती वेडे ना आम्ही? तू काही मागतच नाही ना? फक्त फलाची अपेक्षा करता

नेकीने काम करायला सांगतो. जोडीला फक्त

नामस्मरण. पण आम्ही पार भरकटलो रे. तू हृदयात नव्हे प्रत्येक जीवात साक्षात असतांना मुर्खासारखे तुला शोधायला काशी रामेश्वरला

जातो नि केलेली पापे धुण्याचा विफल प्रयत्न

करतो व स्वत:चीच फसवणूक करतो. तू दिलेल्या इतक्या उत्तम बुद्धीचा नीट वापरही करू

नये हे आमचे केवढे दुर्भाग्य आहे ना? म्हणतात ना..” दैव देते नि कर्म नेते” अशी आमची गत आहे. जाऊ दे… शेवटी ज्याचे त्याचे कर्म ज्याच्या

त्याच्या जवळ, तसेच तू फळ देतो, हे ही खरेच

आहे.तुझ्या विषयी काय आणि किती बोलावे?

तू अनादी आहेस, अनंत आहेस नि मुख्य म्हणजे

आमच्या हृदयात, इतका निकट आहेस. निदान मी तरी तुला देवळात शोधत नाही. सर्व जातात

म्हणून प्रसंगी मी ही जाते एवढंच.माझी पूर्ण खात्री आहे,” तू आहेसच आमच्या हृदयात”.

मला तरी कुठल्याही साक्षी पुराव्यांची गरज

नाही एवढेच तुला सांगते नि थांबते.

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा